भारतीय नौदलासाठी बहुउपयोगी अशा १६ हेलिकॉप्टरची खरेदी करण्याचा निर्णय सरकारने लांबणीवर टाकला आहे. या व्यवहारांशी संबंधित असलेल्या दोन कंपन्यांपैकी फिन्मेकॅनिका ही कंपनी ऑगस्टावेस्टलॅण्डशी निगडित असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला.
संरक्षणमंत्री अरुण जेटली यांनी हा निर्णय घेतला असल्याचे उच्चपदस्थ सूत्रांनी येथे सांगितले. भारतीय दलालांना लाच दिल्याच्या आरोपाप्रकरणी अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसाठी सुमारे ३,६०० कोटी रुपये खर्च करून १२ हेलिकॉप्टर खरेदी करण्याचा निर्णय भारत सरकारने रद्द केला होता. हा व्यवहार ऑगस्टावेस्टलॅण्ड याच कंपनीशी होणार होता.
या व्यवहारावरून एकूणच भारतात आधीच्या युपीए सरकारच्या राजवटीत कमालीचे राजकीय वादळ उठले होते. तत्कालीन संरक्षणमंत्री ए.के.अ‍ॅण्टोनी यांच्यावर जोरदार टीकेची झोड उठविण्यात आली आणि सरकारला घेरण्यासाठी विरोधकांनी व्यापक मोर्चेबांधणीही केली होती. याच पाश्र्वभूमीवर, सरकारने आता नवीन व्यवहार लांबणीवर टाकला असावा, असे बोलले जात आहे.