भारताने कलम ३७० हटवल्यानंतर पाकिस्तानकडून नियंत्रणरेषेवर अनेकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले आहे. त्याला भारतानेही चोख उत्तर दिले आहे. मात्र आता पाकिस्तानच्या अडचणी अधिक वाढणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या वाढणाऱ्या अडचणींमागील कारण आहे भारताला २० सप्टेंबर रोजी मिळाणारी राफेल विमाने. २० सप्टेंबर रोजी फ्रान्सकडून ३६ पैकी काही राफेल विमाने भारताच्या ताब्यात देण्यात येणार असून यासाठी केंद्रीय सुरक्षा मंत्री राजनाथ सिंह आणि हवाईदल प्रमुख एअर चीफ मार्शल बी. एस. धनोआ स्वत: फ्रान्सला जाणार आहेत.

एएनआय वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार २० सप्टेंबरला राफेल विमानांच्या पहिली तुकडी भारतीय हवाईदलाला सुपूर्द करण्यात येणार आहे. या विमानांचा ताबा घेण्यासाठी राजनाथ सिंह आणि हवाई दलाचे प्रमुख स्वत: उपस्थित राहणार आहेत. ही विमाने पारंपारिक पद्धतीने भारताच्या ताब्यात देण्यात येणार आहे. राफेल विमानांना भारताच्या ताब्यात देताना दोन्ही देशांमधील प्रमुख अधिकारी उपस्थित असणार आहे. राफेल विमानांचा भारतीय हवाई दलामध्ये समावेश करुन घेण्यासाठी २४ वैमानिकांना विशेष प्रशिक्षण देण्यात आले आहे. राफेल भारतात दाखल झाल्यानंतर त्याचा तत्काळ वापर करता यावा यासाठी हे प्रशिक्षण देण्यास मागील काही महिन्यांपासून सुरुवात झाली आहे. तीन वेगवेगळ्या तुकड्यांमध्ये हे वैमानिक प्रशिक्षण घेत आहेत. पुढील वर्षी मे महिन्यापर्यंत सर्व राफेल विमाने भारतामध्ये दाखल होणार आहेत. तोपर्यंत वैमानिकांना प्रशिक्षण देण्यात येणार आहेत.

कुठे तैनात करणार ही विमाने

भारतीय हवाई दल सुरुवातीला या नवीन राफेल लडाऊ विमानांपैकी एक-एक विमान हरियाणा आणि अंबाला येथील एअरबेसवर तैनात करणार आहे. पाकिस्तानच्या कारवायांना उत्तर देण्यासाठी येथे ही विमाने तैनात करण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे पश्चिम बंगालमधील हाशिमारा एअरबेसवर एक राफेल तैनात करण्यात येणार असून चीनच्या सीमेवरील हलचाली लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आल्याचे कळते. आपली पूर्वेकडील आणि पश्चिमेकडील सीमावरील शेजारी राष्ट्रांच्या हलचाली लक्षात घेऊन ही विमाने तैनात करण्यात येणार आहे.

सप्टेंबर २०१६ मध्ये भारत सरकारने फ्रान्सबरोबर ३६ राफेल विमाने खरेदी करण्याबद्दल करार केला होता. या विमानांची किंमत ७.५७ बिलियन युरो इतकी आहे.