चीनबरोबर एलएसीवर निर्माण झालेली तणावपूर्ण परिस्थिती पाहता, सीमाभागातील रोड कनेक्टिविटी अधिक उत्तम करण्याच्यादृष्टीने भारताकडून जलदगतीनं पावलं उचलली जात आहेत. याच पार्श्वभूमीवर केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी आज (सोमवार) लडाख, अरुणाचल प्रदेश, सिक्कीम, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पंजाब आणि जम्मू-काश्मीरच्या सीमा भागात उभारण्यात आलेल्या ४४ पुलांचं ऑनलाइन कार्यक्रमाद्वारे उद्घाटन केलं.

पुलांचे उद्घाटन केल्यानंर बोलताना संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी पाकिस्तान व चीनशी लागून असलेल्या भारतीय सीमांवरील परिस्थितीचा संदर्भ देखील दिला.

संरक्षणमंत्री म्हणाले, “तुम्हा सर्वांना आपल्या उत्तर आणि पूर्व सीमांवरील परिस्थिती माहिती आहे. अगोदर पाकिस्तान आणि आता चीन. असं वाटतं की एका मिशन अंतर्गत सीमा वाद निर्माण करण्यात आले आहेत. या देशांबरोबर आपली जवळपास ७ हजार किलोमीटर लांब सीमा आहे. जिथं तणाव कायम आहे.दूरदृष्टी असलेल्या पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात भारत या संकटांचा केवळ मजबूतपणाने सामनाच करत नाहीतर, या सर्व क्षेत्रांमध्ये मोठे व ऐतिहासिक बदल देखील घडवत आहे.”

अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार या ४४ पुलांपैकी लडाखमधील सात पुलांसह बहुतांश पूल हे रणनितीच्यादृष्टीने महत्वपूर्ण भागात आहेत. ज्यांची आपल्या सैन्याला शस्त्रांची वाहतूक करण्यासाठी मदत होणार आहे. हे पूल बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन(बीआरओ) कडून उभारण्यात आले आहेत.

संरक्षणमंत्र्यांनी सांगितले की, पूलांचा फायदा सर्वसामान्यांबरोबरच भारतीय सेनेलाही होणार आहे. आपल्या सशस्त्र दलाचे जवान त्या भागांमध्ये मोठ्या संख्येने तैनात आहेत. जिथं वर्षभर वाहतुकीची सुविधा नसते. या पूलांच्या उभारणीसाठी त्यांनी बीआरओचे अभिनंदन देखील केले.