Rajnath Shing : माजी लष्कर प्रमुख नरवणे यांच्या अप्रकाशित पुस्तकातल्या एका उल्लेखावरुन लोकसभेत जोरदार गदारोळ पाहण्यास मिळाला. लोकभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी राष्ट्रपतीच्या अभिभाषणाच्या धन्यवाद प्रस्तावावर बोलत असताना नरवणे यांच्या पुस्तकाचा उल्लेख केला आणि राहुल गांधी म्हणाले की नरवणे यांच्या पुस्तकात उल्लेख आहे की डोकलाममध्ये आणि भारतीय सीमेमध्ये चीनने घुसखोरी केली आहे. मात्र नरवणे यांच्या पुस्तकाचा उल्लेख करताच लोकसभेत हंगामा पाहण्यास मिळाला.
राजनाथ सिंह यांनी काय म्हटलं आहे?
माजी लष्कर प्रमुख मनोज नरवणे यांचं आत्मचरित्र प्रकाशित होत नसेल तर त्यामागे तसंच काही कारण असेल. जर योग्य कारणाशिवाय आत्मचरित्र प्रकाशित करण्यास कोणी अटकाव करत असेल तर नरवणे कोर्टाचा आदेश आणून पुस्तक प्रकाशित करू शकतात. त्यांनी तसे का नाही केले असा प्रश्न संरक्षणमंत्री राजनाथ सिंहांनी लोकसभेत विचारला आहे. एवढंच नाही तर जे पुस्तक प्रकाशित झालेलंच नाही त्या पुस्तकाचा उल्लेख कसा काय केला जातो आहे? राहुल गांधी यांचं वर्तन हे नियमबाह्य आहे असंही राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे.
राहुल गांधींवर सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका
संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राजकीय वातावरण तापलं आहे. विरोधी पक्षाने अर्थसंकल्प निराशाजनक आहे अशी टीका केली. त्यानंतर राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर चर्चा सुरु झाली. राहुल गांधी बोलायला उभे राहिले तेव्हा त्यांनी नरवणेंच्या पुस्तकाचा उल्लेख केला. त्यानंतर जोरदार हंगामा पाहण्यास मिळाला. राहुल गांधी म्हणाले मी या पुस्तकाचा उल्लेख करणार नव्हतो पण आमच्या खासदारांच्या देशभक्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं त्यामुळे मी हा उल्लेख केला. आर्मीचे निवृत्त प्रमुख नरवणे यांच्या पुस्तकाचा उल्लेख केला. त्यानंतर माझ्या हातात एक मॅगझीन आहे, त्या मॅगझीनमध्ये लेख आहे तो मी कोट करु इच्छितो असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. तसंच मोदी सरकार घाबरत नसेल तर मला बोलू का दिलं जात नाही? असा प्रश्न राहुल गांधींनी विचारला. दरम्यान संरक्षण मंत्री राजनथ सिंह यांनी विरोधी पक्षनेत्यांनी नियमबाह्य वर्तन करु नये असं म्हटलं आहे. ओम बिर्ला यांनीही राहुल गांधी यांना जे पुस्तक प्रकाशितच झालं नाही त्याचा उल्लेख करु नका आणि आपल्या लोकसभेच्या सभागृहाची मर्यादा पाळा असंही ओम बिर्ला यांनी म्हटलं आहे.

