भारतीय संरक्षण दलाचे प्रमुख जनरल बिपीन रावत यांच्या हेलिकॉप्टरचा तामिळनाडूमध्ये अपघात झाला आहे. समोर आलेल्या माहितीनुसार कोईम्बतूर आणि सुलूरदरम्यान कुन्नूर येथे लष्कराचं हेलिकॉप्टर कोसळून भीषण दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी माहिती घेतली आहे. दरम्यान, रिपब्लिक टीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार राजनाथ सिंह हे आपले सर्व नियोजित कार्यक्रम रद्द करुन तातडीने अपघात झालेल्या ठिकाणाला भेट देणार आहेत. रावत यांच्या हेलिकॉप्टरला अपघात झाल्याची माहिती मिळाल्यानंतर राजनाथ सिंह यांनी हा मोठा निर्णय घेतल्याची माहिती समोर येत आहे. संरक्षण मंत्र्याच्या भेटीसंदर्भातील तयारी केली जात असल्याची माहिती समोर आली आहे.

या हेलिकॉप्टरमध्ये एकूण सात जण प्रवास करत होते अशी माहिती भारतीय हवाई दलाने दिलीय. या अपघातात चार जण गंभीर जखमी झाले असून बिपीन रावतही जखमी झाले आहेत. बिपीन रावत यांच्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुरु आहेत.

बिपीन रावत यांच्यासहीत दोन जणांचा शोध लागला असून त्यांच्यावरही स्थानिक रुग्णालयामध्ये उपचार सुरु असल्याची माहिती समोर येत आहे. या अपघातानंतर स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य सुरु केलं. हेलिकॉप्टरमधील इतर प्रवाशांचा शोध सध्या सुरु आहे.

बिपीन रावत सुखरुप असावेत अशी प्रार्थना; नितीन गडकरींसहीत सर्वच नेत्यांनी व्यक्त केल्या भावना

हवाई दलाने बिपीन रावत या दुर्घटनाग्रस्त हेलिकॉप्टरमधून प्रवास करत होते याला दुजोरा दिला आहे. याप्रकरणी चौकशीचे आदेशही देण्यात आल्याचं हवाई दलाने सांगितलं आहे.

बिपीन रावत यांच्यासोबत त्यांच्या पत्नीदेखील हेलिकॉप्टरमध्ये होत्या असं सांगितलं जात आहे. दुर्घटनेचं नेमकं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. मात्र तांत्रिक कारणामुळे दुर्घटना झाल्याची प्राथमिक माहिती आहे.