पीटीआय, नवी दिल्ली

नौदलासाठी आठ अत्याधुनिक युद्धनौकांची खरेदी करण्यात येणार असून, त्यासाठी संरक्षण मंत्रालयाने सोमवारी ५३ हजार कोटी रुपयांचा करार केला. ‘गार्डन रीच शिपबिल्डर्स अँड इंजिनीअर्स लिमिटेड’ (जीआरएसई) आणि ‘गोवा शिपयार्ड लिमिटेड’ (जीएसएल) यांच्याबरोबर हे करार करण्यात आले.

चीनच्या हिंदी महासागर क्षेत्रासह इतर ठिकाणी वाढत्या हालचालींच्या पार्श्वभूमीवर भारतीय नौदलाची सज्जता वाढवण्यासाठी आठ युद्धनौकांच्या खरेदीचे हे करार करण्यात आले. नौदलासाठी कॉर्व्हेट प्रकाराच्या आठ नौका खरेदी करण्यात येणार आहेत. ‘जीआरएसई’ पाच कॉर्व्हेटची बांधणी करणार असून, उर्वरित तीन कॉर्व्हेटची बांधणी ‘जीएसएल’ करणार आहे. या नौकांची रचना नौदल करणार आहे. अशा प्रकारचा हा पहिलाच प्रकल्प असल्याचे संरक्षण मंत्रालयाने सांगितले. कॉर्व्हेट या अत्याधुनिक क्षेपणास्त्रे, रडार यंत्रणा, सेन्सर्सनी सज्ज असतील.

देशाच्या जहाजबांधणी क्षेत्राला मोठी चालना मिळेल, असे संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी या वेळी सांगितले. तसेच, या कंत्राटामुळे पुढील १० वर्षे जहाजबांधणी क्षेत्रात आणि संबंधित लघु, मध्यम उद्योगांमध्ये मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मिती होईल.