संरक्षणतज्ज्ञ अजय सहानी यांचे मत

(महेश सरलष्कर, नवी दिल्ली) जम्मू-काश्मीरमध्ये पीडीपी आणि भाजपची आघाडी अनैसर्गिकच होती. दोघांचीही विचारसरणी आणि राजकीय आधार वेगवेगळे आहेत. त्यामुळे ही आघाडी फार काळ टिकणार नव्हती. शस्त्रसंधीच्या निर्णयाने अखेरची कुऱ्हाड मारली गेली, असे मत ‘इन्स्टिटय़ूट फॉर कॉन्फिक्ट मॅनेजमेंट’चे कार्यकारी संचालक आणि संरक्षणतज्ज्ञ अजय सहानी यांनी व्यक्त केले.

तात्पुरत्या शस्त्रसंधीचा निर्णय भाजपवर थोपवला गेलेला होता. योजनाबद्धरीत्या हा निर्णय घेतल्याचे भाजप सांगत होता. मात्र वास्तवात  मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी ईदच्या काळात शस्त्रसंधी करण्याची मागणी करून केंद्रावर दबाव वाढवला. त्या शस्त्रसंधीचा फायदाही झाला नाही. पण, पीडीपीला शस्त्रसंधीला मुदतवाढ हवी होती. काश्मीरमधील हिंसक परिस्थिती पाहता केंद्राला तसे करणे शक्य नव्हते. त्यामुळे शस्त्रसंधी संपणारच होती. अर्थात हे पीडीपीसाठी राजकीयदृष्टय़ा हानीकारक होते. त्यामुळे आघाडी संपुष्टात आली, असे विश्लेषण सहानी यांनी केले.

गेल्या तीन वर्षांत म्हणजे २०१३ पासून धर्माच्या आधारावरील राजकारण (रॅडिकलायझेशन) केले गेल्याने जम्मू आणि काश्मीर खोरे यांच्यात दुफळी वाढलेली आहे. जम्मूमध्ये भाजपने आणि खोऱ्यात पीडीपीने भावनातिरेकाचे राजकारण केले. आता कदाचित राष्ट्रपती राजवट लागू झाल्यावर काही प्रमाणात स्थैर्य येऊ शकेल. पण, त्यातही धोका असतोच. राजकीय प्रक्रियेत अडथळे येतात. शिवाय पीडीपी आणि नॅशनल कॉन्फरन्स छुप्या विभाजनाची भाषा बोलू लागतात. हा धोका कसा टाळला जाईल हे पाहणे गरजेचे आहे, असे सहानी म्हणाले.

भाजपकडे काश्मीर धोरणच नाही!

भाजपकडे काश्मीरविषयक धोरणच नाही. भाजपकडून उलटसुलट मुद्दे उपस्थित केले जात असतात. कधी ३७० मुद्दा, कधी नागरिकत्वाचा मुद्दा. घटना बदलण्याची क्षमता भाजपकडे नाही. मग, वादग्रस्त मुद्दे उपस्थित करून काय हाती लागणार आहे? अशा मुद्दय़ांवरून लोकांना भडकवले जात आहे. भाजपचे जम्मूमध्ये आणि काश्मीर खोऱ्यात पीडीपीचे विभाजनाचे राजकारण सुरू आहे. दोघांनीही राजकीय-सामाजिक आग लावली त्यात लोकांचे जीव गेले. मग शांतता येणार कशी, असा सवाल सहानी यांनी उपस्थित केला.

कारवायांमधील यश स्थानिकांमुळेच

लष्कराला दहशतवाद्यांविरोधातील यश स्थानिक लोकांच्या पाठिंब्यामुळेच मिळत आहे. त्यांच्याकडूनच राज्य पोलिसांना दहशतवादी कुठे लपलेले आहेत याची माहिती मिळते. संपूर्ण काश्मीरमध्ये हिंसाचार भडकलेला नाही. सोपोर वा उत्तरेकडील त्राल अशा काही विशिष्ट भागांमध्येच िहसक घटना होत आहेत. दगडफेकही याच भागांत होत आहे. पूर्ण खोऱ्यापैकी हा भाग जेमतेम पाच टक्के आहे. इथे ‘आयएसआय’चा प्रभाव आहे. दहशतवादी या भागांतून काश्मीरमध्ये घुसखोरी करतात. बाकी काश्मीर शांत आहे. २००१ मध्ये चार हजार लोक मारले गेले होते. या वर्षी ३३३ जण ठार झाले. हे पाहता काश्मीरमधील परिस्थिती बदलत आहे, असा दावा सहानी यांनी केला.