संरक्षण दलाचे Ordinance Factory Board विसर्जित, ७ कंपन्यात केले रुपांतर

कंपन्यांपुढे उत्पादन क्षमता, गुणवत्ता वाढवण्याचे लक्ष्य. संरक्षण सिद्धतेत स्वावलंब होण्यासाठी पावले उचलण्याचे कंपन्यांना पंतप्रधानांनी केले आवाहन

Ordinance Factory Board

संरक्षण दलाचा अविभाज्य भाग असलेले सर्वपरिचित आयुध निर्माण मंडळ म्हणजेच Ordinance Factory Board हे आज अखेर विसर्जित करण्यात आले. आता या मंडळाचे रुपांतर ७ कंपन्यांमध्ये करण्यात आल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत एका आभासी कार्यक्रमाद्वारे घोषित करण्यात आलं. देशात १० राज्यात ४१ ठिकाणी दारुगोळा – शस्त्र निर्मितीचे कारखाने, असा Ordinance Factory Board चा पसारा होता. आता या सर्वांना ७ कंपन्यांमध्ये विभागण्यात आलं आहे. सुमारे ७५ हजार कर्मचारी या मंडळात काम करत असून कोणालाही न काढता यांना ७ कंपन्यांमध्ये केंद्रीय कर्मचारी म्हणून सामावून घेतले जाणार आहे. ही प्रक्रिया पुढील दोन वर्षात पुर्ण केली जाणार आहे.

यानिमित्ताने भाषण करतांना Ordinance Factory Board बद्दल परखड मते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली. “एकेकाळी जगातील शक्तिशाली संस्थापैकी एक म्हणून Ordinance Factory Board ची ओळख होती. काहींकडे चांगल्या सुविधा होत्या, कौशल्य होतं. जागतिक महायुद्धाच्या काळात या संस्थांची ताकद जगाने बघितली होती. स्वातंत्र्यानंतर आधुनिकीकरण करणे आवश्यक होते, काळानुसार बदलण्याची गरज होती. मात्र लक्ष दिलं गेलं नाही, यामुळे संरक्षणात्मक गरजेसाठी विदेशावर अवलंबून रहायची वेळ आली. तेव्हा परिवर्तनासाठी आता या ७ कंपन्या मोठी भूमिका बजवणार आहेत. गेल्या ७ वर्षात परिस्थिती बदलली आहे. संरक्षण विभागाच्या कारभारात पारदर्शकता आणली आहे. स्वातंत्र्यानंतर आता खूप मोठे बदल संरक्षण क्षेत्रात होत आहेत”, असं पंतप्रधान म्हणाले. या नव्या कंपन्यांबरोबर येण्याचं आवाहन देशातील संरक्षण क्षेत्रात काम करु इच्छिणाऱ्या खाजगी कंपन्यांना पंतप्रधान यांनी यावेळी केलं.

Ordinance Factory Board ला आता पुढील ७ कंपन्यांत विभागण्यात आलं आहे.

१. Advanced Weapons & Equipment India (AWE India) – ही कंपनी संरक्षण दलाच्या तिन्ही दलासाठी विविध प्रकारच्या बंदुका, रायफल, तोफा बनवण्याचं काम करणार आहे.

२..Armoured Vehicles Nigam Ltd (AVANI) – ही कंपनी लष्करासाठी आवश्यक सर्व प्रकारचे रणगाडे, चिलखती वाहनं, वाहतुकीची वाहनं आणि त्यांचे इंजिन बनवण्याचे काम करेल.

३..Munitions India Ltd (MIL) – संरक्षण दलासाठी सर्व प्रकारच्या बंदुकीच्या गोळ्या, तोफगोळे, हँन्डग्रेनेड, रॉकेट लॉन्चरमधील रॉकेट, विविध प्रकारचे बॉम्ब, स्फोटकं बनवण्याचे काम ही कंपनी करेल.

४..Yantra India Ltd (YIL) – सर्व प्रकारचे मिश्र धातू आणि काही वैशिष्ट्यपुर्ण धातू यांपासून बनवले जाणारे लष्करी साहित्य, सुटे भाग ही कंपनी तयार करणार आहे.

५.. Gliders India Ltd (GIL) – सरंक्षण दलात लढाऊ विमानांमध्ये, लष्करी सामान हवेतून जमिनीवर टाकण्यासाठी तसंच सैनिकांसाठी मोठ्या प्रमाणात वापरल्या जाणाऱ्या पॅराशूट निर्मितीचे काम ही कंपनी करणार आहे.

६..Troop Comforts Ltd (TCL) – ही कंपनी सैनिकांसाठी शिरस्त्राण, विविध प्रकारचे युनिफॉर्म -कपडे- बूट, तंबू, जॅकेटचे उत्पादन करणार आहे.

७.. India Optel Ltd (IOL) – विविध प्रकारची इलेक्ट्रॉनिक उपकरणे, ऑप्टीकल उपकरणे, नाईट व्हीजन उपकरणे, लेझरवर आधारीत उपकरणे, विविध प्रकारची वायर्स-केबल यांचे उत्पादन ही कंपनी करणार.

या कंपनीच्या माध्यमातून देशाच्या संरक्षण दलाची गरज भागवली जाईलच, त्याचबरोबर निर्यातीकडेही विशेष लक्ष दिले जाणार असल्याचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी यावेळी सांगितलं. स्पर्धात्मक क्षेत्रातील प्रवेशामुळे या कंपन्याचा दर्जा, गुणवत्ता वाढेल अशी अपेक्षा संरक्षण मंत्र्यांनी व्यक्त केली.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Defense ministry dissolved ordinance factory board 7 companies formed asj82

Next Story
पेट्रोल, डिझेल, एलपीजी दरात पुढील आठवडय़ात वाढ?
ताज्या बातम्या