Dehradun Caste Clash Youth Death Bulldozer Action : उत्तराखंडच्या डेहराडून जिल्ह्यातील बैरागीवाला गावात दोन गटांत तुंबळ हाणामारी झाली. या घटनेत एका तरुणाचा मृत्यू झाला असून तिघे गंभीर जखमी झाले. शेतातील पाण्याच्या वादातून ही हिंसा भडकल्याचे पोलिसांनी सांगितले. शनिवारी उशिरा घडलेल्या या घटनेमुळे परिसरात मोठा तणाव निर्माण झाला. याप्रकरणी फरार झालेल्या आरोपीचे घरावर स्थानिक प्रशासनाने बुलडोजर कारवाई केली. मात्र, आरोपीचा होईपर्यंत मृतदेहावर अंत्यसंस्कार नाही, अशी भूमिकाच मृत तरुणाच्या कुटुंबियांनी घेतली.
डेहराडूनचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक पंकज गैरोला यांनी दिलेल्या माहितीनुसार, बैरागीवाला गावात शनिवारी रात्री उशिरा दोन गटांत मोठा वाद झाला. त्यावेळी एका समुदायातील काही लोकांनी दुसऱ्या समुदायातील व्यक्तींवर धारदार शस्त्रे आणि लोखंडी रॉडने हल्ला केला. या घटनेत चार जण गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान एका तरुणाचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या घटनेनंतर परिसरात तणाव वाढला असून कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांचा अतिरिक्त फौजफाटा तैनात करण्यात आला. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपीचा शोध घेण्यासाठी तीन विशेष पथके रवाना झाली.
आणखी वाचा
दरम्यान, मृत व्यक्तीचे वडील भगवत यांनी दावा केला की, पैशांच्या व्यवहारावरून झालेल्या जुन्या वादातून त्यांच्या मुलाची हत्या करण्यात आली. मात्र पोलिसांनी हा संघर्ष पाण्याच्या वादातून सुरू झाल्याचे सांगितले आहे. एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना भगवत म्हणाले की, मी घटनास्थळी नव्हतो. त्यावेळी प्रत्यक्ष भांडण सुरू नव्हते. पैशांबाबतची चर्चा एक दिवस आधी झाली होती. आरोपी इम्तियाज याच्याकडे माझ्या मुलाचे १४ हजार रुपये होते. आम्हीही त्याला पैशाची मागणी केली होती. मात्र, त्याआधीच इम्तियाजने माझ्या मुलाची हत्या केली. घटनेनंतर परिसरात मोठी गर्दी जमली होती. इम्तियाज आणि त्याच्या मित्रामुळेच माझ्या मुलाचा जीव गेला. जोपर्यंत पोलिस दोन्ही आरोपांचा एन्काउंटर करीत नाहीत, तोपर्यंत मृतदेहावर अंत्यसंस्कार होणार नाही.
देहरादूनचे गुन्हे शाखेचे पोलीस अधीक्षक जितेंद्र चौधरी यांनी सांगितले की, कुटुंबीयांनी दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांची तीन पथके रवाना झाली असून लवकरच आरोपींना अटक केली जाईल. दरम्यान, गुन्हा दाखल झाल्यानंतर प्रशासनाने आरोपींविरोधात तात्काळ कारवाई सुरू केली असून, पोलीस आणि जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत एका आरोपीचे घर बुलडोझरने जमीनदोस्त करण्यात आले आहे. आरोपींना अटक करण्यासाठी शोध मोहीम तीव्र करण्यात आली असून पोलीस परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
दरम्यान, कायदा हातात घेणाऱ्या किंवा गुन्हेगारी कृत्य करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला अजिबात माफ केले जाणार नाही, असा इशारा उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी रविवारी दिला. डेहराडूनमध्ये नुकत्याच झालेल्या हिंसक घटनेचा प्रशासनाकडून तपास केला जात असून सर्व कायदेशीर बाजूंची तपासणी केल्यानंतरच पुढील कारवाई होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. राज्यात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे. या प्रकरणाचा तपास तातडीने पूर्ण करून सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश पोलिस आणि जिल्हा प्रशासनाला दिले आल्याचे धामी यांनी स्पष्ट केले आहे. सध्या डेहराडून जिल्ह्यातील बैरागीवाला परिसरात तणावपूर्ण शांतता आहे.
