Kshitij Chaudhary Accident Case Mother Finds Evidence: १८ वर्षांचा आपला मुलगा गमावल्यानंतर देहरादूनमधील ललिता चौधरी कोलमडून गेल्या. मुलगा गमावल्याचे दुःख होतेच. पण त्यानंतर पोलिसांच्या उदासीनतेमुळे ललिता चौधरींना धक्काच बसला. दोन वर्षे तपास करून पुरावा न आढळल्यामुळे पोलिसांनी हे प्रकरण बंद केले होते. मात्र ललिता चौधरी यांनी आपल्या मुलाच्या मृत्यूला जबाबदार असणाऱ्याला शोधून काढण्याचा चंगच बांधला होता. दोन वर्षांच्या अथक प्रयत्नानंतर त्यांनी अखेर पुरावा शोधून काढला आणि पोलिसांना या घटनेचा नव्याने तपास सुरू करावा लागला.
नेमकी घटना काय आहे?
क्षितिज चौधरी याचे १६ फेब्रुवारी २०२४ रोजी अपघाती निधन झाले होते. पोलिसांनी प्रकरणाचा तपास केला, पण हाती काही पुरावा लागत नसल्यामुळे त्यांनी गुन्हेगाराचा शोध घेणे जवळजवळ सोडून दिले. मात्र आईचे मन ललिता चौधरी यांना स्वस्थ बसू देत नव्हते. त्या अपघातस्थळावर वारंवार जात होत्या. कोणीतरी प्रत्यक्षदर्शी दिसेल, काहीतरी पुरावा किंवा सीसीटीव्ही फुटेज मिळेल, याचा प्रयत्न त्यांनी केला.
एकेदिवशी ललिता यांना यश आले. इंडियन एक्सप्रेसला याबद्दल माहिती देताना त्यांनी सांगितले, अपघात झाला त्या रस्त्यावर एक गोदाम होते. गोदामातील सीसीटीव्ही रस्त्याच्या बाजूला असल्याचे दिसले. मी लगेचच गोदामाच्या मालकाला फोन करून सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध करून देण्याची मागणी केली. सुरुवातीला त्यांनी टाळाटाळ केली. पण पाठपुरावा केल्यानंतर त्यांनी फुटेज उपलब्ध करून दिले.
मागच्या आठवड्यात देहरादून पोलिसांनी क्षितिजच्या अपघाती मृत्यूची पुन्हा एकदा चौकशी सुरू करणार असल्याचे सांगितले. ललिता चौधरी या एकट्याच क्षितिजचे संगोपन करत होत्या. घरोघरी जाऊन ब्युटिशियन म्हणून काम करणाऱ्या ललिता यांनी गेल्या दीड वर्षात गुन्हेगार शोधण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. अखेर त्यांनी सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून ट्रक शोधून काढला. ज्यामुळे तपासाला गती मिळाली.
याबद्दल माहिती देताना ललिता चौधरी म्हणाल्या, “क्षितिजच्या मृत्यूनंतर मी कामाला जाणे सोडून दिले. चार महिने मी घरीच होते. माझ्या आई-वडिलांनी माझ्या मुलीच्या शिक्षणाचा खर्च उचलला. तसेच आमच्या देहरादूनच्या घराचे भाडेही भरले.”
अपघात कसा घडला?
क्षितिज आणि त्याचा मित्र जित नायक हे रात्री पावणे तीन वाजता प्रेम नगरहून देहरादूनच्या दिशेने पायी चालत निघाले होते. त्यावेळी एका डम्परने त्यांना धडक दिली. नायकने आपत्कालीन सेवेला फोन केल्यानंतर क्षितिजला डून रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर ऋषिकेशमधील मोठ्या रुग्णालयात हलवले. मात्र उपचारादरम्यान १७ फेब्रुवारी रोजी त्याचा मृत्यू झाला.
क्षितिजवर अंत्यसंस्कार झाल्यापासून ललिता चौधरी गुन्हेगाराचा झपाटून शोध घेत होत्या. याबद्दल माहिती देताना त्या म्हणाल्या, १९ फेब्रुवारी रोजी मी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलीस तपासाचे कारण पुढे करत होते. मात्र त्यांच्या तपासात गती दिसत नव्हती. शेवटी मीच माझ्या परिने प्रयत्न सुरू केले. रस्त्यावर असलेला प्रत्येक कॅमेरा तपासला. अनेक दुकानदारांना विनंती करून सीसीटीव्ही देण्याची मागणी केली.
हा तपास करत असताना अनेक दिवस गेले. माझे काम सोडावे लागले. मी रोज रात्री ११ वाजता अपघाताच्या ठिकाणी जात होते. कुणीतरी माहिती देणारा सापडेल या आशेने रोज तपास करत होते. तीन महिन्यांनी मला एका गोदामात कॅमेरा असल्याचे लक्षात आले. त्या कॅमेऱ्यातील अस्पष्ट फुटेजद्वारे विभागीय परिवहन कार्यालयातून संबंधित ट्रकची माहिती काढली.
ही माहिती देऊनही पोलीस तपासात सहकार्य करत नव्हते. अखेर शेतकरी नेते राकेश टिकैत यांची मदत घेऊन मी जिल्हा पोलीस अधीक्षकांची भेट घेतली. माझ्याबरोबर घडलेला प्रसंग ऐकून पोलीस अधीक्षकांनी तपास पुन्हा सुरू करण्याचे आदेश दिले. त्यामुळे सुमारे दोन वर्षांपासून ललिता चौधरी करत असलेल्या प्रयत्नांना यश लाभले.
