Dehradun Woman Suicide update : लग्नानंतर अवघ्या आठ महिन्यांतच एका नवविवाहितेने सासरच्या छळाला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना उत्तराखंडच्या देहराडूनमधील डोईवाला पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या हर्रावाला येथे घडली. अपशकुनी असल्याचा ठपका ठेवत सासरचे सातत्याने छळ करत होते, असं संबंधित महिलेने आत्महत्या करण्याच्या आधी रेकॉर्ड केलेल्या व्हिडिओमध्ये म्हटलं आहे. सृष्टी कंधारी असं मृत महिलेचं नाव आहे. सृष्टीच्या आईने दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी राज्य सचिवालयात खासगी सचिव असलेला तिचा पती, सासू आणि नणंद यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. एनडीटीव्हीने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

सृष्टीचा वारंवार होत होता अपमान

सृष्टीच्या पालकांनी आरोप केला आहे की, तिच्या लग्नानंतर हुंडा आणि इतर कारणांमुळे पती आणि सासरच्या लोकांकडून तिचं मानसिक खच्चीकरण केलं जात होतं. सृष्टीची आई सीमा कंधारी यांनी डोईवाला पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटलं आहे की, त्यांच्या मुलीचं लग्न नोव्हेंबर २०२५ मध्ये हर्रावाला येथील दिल्ली फार्म्सचे रहिवासी असलेल्या सौरभ रतुरी यांच्याशी झालं होतं. सीमा यांनी आरोप केला की, लग्नानंतर हुंडा आणि इतर मुद्द्यांवरून सासरच्या लोकांनी सृष्टीचा वारंवार अपमान केला. इतकंच नव्हे तर तिचं मानसिक खच्चीकरण करून तिला ‘अपशकुनी’ असं संबोधलं गेलं.

सीमा यांनी तक्रारीत नमूद केलं की, “२८ आणि २९ जुलै रोजी माझा माझ्या मुलीशी फोनवर संपर्क होऊ शकला नाही. त्यानंतर मी सासरच्या घरी एका ओळखीच्या व्यक्तीला पाठवलं. सृष्टीची तब्येत बिघडल्यामुळे तिला रुग्णालयात नेण्यात आल्याचं सासरच्या लोकांनी त्या व्यक्तीला सांगितलं. आम्ही आमच्या मूळ गावी, श्रीनगरहून तातडीने देहराडूनला पोहोचलो, तेव्हा सृष्टीचा मृत्यू झाल्याचं आम्हाला समजलं.”

सासरच्या लोकांनी सृष्टीच्या मृत्यूची माहिती वेळेवर दिली नसल्याचंही त्यांनी सांगितलं. “विचारणा केली असता, आम्ही व्यस्त असल्यामुळे फोन करू शकलो नाही, असं त्यांनी सांगितलं”, असं सीमा म्हणाल्या. सृष्टीच्या मृत्यूला तिच्या सासरच्या लोकांना जबाबदार धरताना त्या म्हणाल्या की, लग्नाच्या तीन महिन्यांनंतर सृष्टीच्या सासऱ्यांना हृदयविकाराचा झटका आला होता. “यानंतर सासरच्या लोकांनी एका पुजाऱ्याचा सल्ला घेतला, ज्याने माझी मुलगी अलक्ष्मी असल्याचं सांगितलं; त्यानंतर तिचा छळ वाढला”, असं सीमा यांनी सांगितलं.

आत्महत्या करण्यापूर्वी रेकॉर्ड केला व्हिडिओ

दरम्यान, फाशी घेण्यापूर्वी रेकॉर्ड केलेल्या ९० सेकंदांच्या व्हिडिओमध्ये, सृष्टी रडताना आणि आपले अश्रू पुसताना दिसत आहेत. व्हिडिओ सुरू झाल्यानंतर तब्बल ३५ सेकंदांनी त्यांना कसेबसे बोलणं शक्य झालं. “सॉरी मम्मी, मी अशी जात आहे,” असं त्या हुंदके देत म्हणाल्या. “सगळं काही खूप विचित्र झालं आहे. मी गेल्या सहा महिन्यांपासून हे सहन करत आहे. आता मी आणखी सहन करू शकत नाही. सासरच्यांची मानसिकता कधीच बदलू शकत नाही. लग्नानंतर घडलेल्या प्रत्येक गोष्टीसाठी ते मलाच दोष देत राहतात. मला सतत अपशकुनी म्हणत राहिले”, असं सृष्टी व्हिडिओमध्ये म्हणाल्या.

डोईवाला येथील पोलीस अधीक्षक वंदना वर्मा यांनी सांगितलं की, सौरभ, त्याची आई परवीना देवी आणि बहीण चारू यांच्याविरुद्ध बीएनएस (BNS) च्या संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. “तिन्ही आरोपींनी सृष्टीचा मानसिक आणि शारीरिक छळ केला, यामुळे तिचा मृत्यू झाला, असा आरोप तक्रारदाराने केला आहे. शवविच्छेदन अहवाल, फॉरेन्सिक पुरावे आणि इतर तांत्रिक तथ्यांच्या आधारे या प्रकरणाचा निष्पक्ष तपास केला जाईल. तपासाच्या निष्कर्षांवरून पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल”, असं वर्मा यांनी सांगितले.