दिल्लीतील विनोद नगर येथील सरकारी शाळेत पुस्तक आणायला विसरल्याने १० वर्षीय मुलीला शिक्षा करण्यात आली. तिला वर्गाच्या मागे हात वर करून उभे करण्यात आले आणि नंतर वर्गात बंद करण्यात आल्याचा कुटुंबीयांचा आरोप आहे. या घटनेनंतर प्रकृती खालावलेल्या मुलीचा महिनाभराहून अधिक काळ उपचार घेतल्यानंतर २७ ऑगस्ट रोजी रुग्णालयात मृत्यू झाला. याबद्दल सविस्तर वृत्त हिंदुस्थान टाइम्सने दिले आहे.

कुटुंबीयांचा नेमका आरोप काय?

मुलीच्या कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, २२ जुलै रोजी सकाळी ती कल्याणपुरी येथील घरातून शाळेसाठी निघाली. सकाळी साडेनऊच्या सुमारास तिच्या वर्गशिक्षिकेने कुटुंबीयांना फोन करून मुलीने कपडे खराब केल्याचे सांगितले आणि कपडे घेऊन येण्यास सांगितले. त्यानंतर काही मिनिटांतच पुन्हा फोन करून तिला घरी घेऊन जाण्यास सांगण्यात आले. मुलीचे आजी-आजोबा शाळेत पोहोचले असता ती बेशुद्ध अवस्थेत आढळल्याचा दावा तिच्या काकूने केला.

‘पुस्तक आणायला विसरली म्हणून शिक्षा’

शुद्धीवर आल्यानंतर मुलीने आजी-आजोबांना आपण पुस्तक आणायला विसरल्याचे सांगितले. त्यानंतर शिक्षिकेने आपल्याला रागावून वर्गाच्या मागे हात वर करून उभे केल्याचे तिने सांगितल्याचा कुटुंबीयांचा दावा आहे. शिक्षक आणि इतर विद्यार्थी वर्गातून बाहेर गेल्यावर तिला वर्गात बंद करण्यात आल्याचा आरोप आहे. तिने दरवाजा ठोठावून बाहेर काढण्याची विनंती केली, मात्र काही वेळाने शिक्षिकेने दरवाजा उघडला तेव्हा ती खाली पडलेली होती, असा कुटुंबीयांचा दावा आहे.

रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू

घटनेनंतर मुलीला प्रथम लाल बहादूर शास्त्री रुग्णालयात नेण्यात आले. त्यानंतर तिला दिल्लीतील मानवी वर्तन आणि संबंधित विज्ञान संस्थेत म्हणजेच आयएचबीएएस येथे दाखल करण्यात आले. मात्र आयएचबीएएसच्या अधिकाऱ्यांनी मुलीला एसएसपीए हा दुर्मीळ आणि गंभीर मेंदूविकार असल्याचे सांगितले. या आजारावर ती सुमारे सहा महिन्यांपासून उपचार घेत होती. हा आजार गोवरच्या विषाणूमुळे होणाऱ्या मेंदूतील सुजेसंबंधित आहे व यात मृत्यूचा धोका जास्त असतो. यानंतर मुलीची प्रकृती अत्यंत खालावली आणि २७ ऑगस्टला तिचा मृत्यू झाला, असे रुग्णालयातील अधिकाऱ्यांनी सांगितले.

कुटुंबीयांनी शाळेबाहेर केले आंदोलन

मुलीच्या मृत्यूनंतर कुटुंबीयांनी सोमवारी शाळेबाहेर आंदोलन केले. शिक्षेबाबत आणि मुलगी बेशुद्ध पडण्याच्या परिस्थितीबाबत योग्य चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली. कुटुंबीयांनी सांगितले की, मुलीला यापूर्वीच एका मेंदूविकाराचे निदान झाले होते आणि तिच्यावर उपचार सुरू होते. ती बरी होईल आणि घडलेली घटना स्वतः सांगेल, अशी आशा असल्याने त्यांनी यापूर्वी पोलिसांत तक्रार केली नव्हती.

दिल्ली सरकारकडून चौकशीचे आदेश

या घटनेची गंभीर दखल घेत दिल्ली सरकारने चौकशीचे आदेश दिले आहेत. शिक्षणमंत्री आशिष सूद यांनी निष्पक्ष चौकशी सुरू असल्याचे सांगितले. चौकशी निष्पक्षपणे व्हावी यासाठी संबंधित शिक्षिकेची तातडीने बदली करण्यात आली आहे. चौकशीत निष्काळजीपणा, कर्तव्यात किंवा अन्य कोणतीही त्रुटी आढळल्यास कठोर कारवाई केली जाईल, असे सूद यांनी स्पष्ट केले.

१०० सरकारी शाळांमध्ये वैद्यकीय कक्ष

दिल्ली सरकारने सरकारी शाळांमध्ये विद्यार्थ्यांना तातडीची आरोग्यसेवा मिळावी यासाठी १०० शाळांमध्ये वैद्यकीय कक्ष सुरू करण्याचा प्रकल्पही जाहीर केला आहे. या कक्षांमध्ये प्राथमिक उपचार, मूलभूत आरोग्यसेवा आणि समुपदेशनाची सुविधा दिली जाणार आहे.

मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्या म्हणण्यानुसार, प्रायोगिक प्रकल्पाच्या आढाव्यानंतर ही सुविधा १,०८६ सरकारी शाळांमध्ये विस्तारली जाणार असून पहिल्या टप्प्यासाठी ५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.