दिल्लीतील बेगमपूर येथे सार्वजनिक उद्यानात १६ वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्काराची धक्कादायक घटना घडली. घटनास्थळापासून पोलीस ठाणे १०० मीटर अंतरावर असून पीडित मुलगी ही तिच्या एका मित्रासोबत उद्यानात बसली असताना तिच्यावर हा प्रसंग ओढावला आहे.

दिल्लीत १२ वीत शिकणारी मुलगी मंगळवारी तिच्या मित्रासोबत बेगमपूर येथील सार्वजनिक उद्यानात मित्रासोबत गप्पा मारत बसली होती. यादरम्यान चार जण त्यांच्याजवळ आले आणि त्यांनी पीडितेसोबत असभ्य वर्तन करायला सुरुवात केली. तिच्या मित्राने यावर आक्षेप घेताच नराधमांनी त्याला बांधून ठेवले आणि पीडित मुलीवर सामूहिक बलात्कार केल्याची तक्रार पोलिसांकडे दाखल झाली आहे. याप्रकरणाची माहिती पोलिसांना दिल्यास वाईट परिणाम भोगावे लागतील अशी धमकीही नराधमांनी त्या मुलीला दिली होती. पीडित मुलीने घटनेनंतर पोलीस नियंत्रण कक्षाला फोन करुन माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पीडित मुलीला वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठवल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. घटनास्थळापासून पोलीस ठाणे १०० मीटर अंतरावर असल्याने कायदा आणि सुव्यवस्थेवरच प्रश्न निर्माण झाले आहेत.

पीडित तरुणीने दिलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपासाला सुरुवात केली आहे. आरोपींचा शोध घेण्यासाठी उद्यानालगतच्या परिसरात शोधमोहीम राबवली जात आहे असे अधिकाऱ्यांनी सांगितले.