Man shoots himself in Delhi Viral Video: पूर्व दिल्लीतील न्यू अशोक नगर परिसरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका व्यक्तीने चुकून स्वतःच्या छातीत गोळी झाडल्याने त्याचा मृत्यू झाला. विशेष म्हणजे, ही संपूर्ण घटना त्याचा मित्र मोबाईलवर चित्रीत करत होता. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओ करताना चुकून गोळी लागण्याने तरुणाचा मृत्यू झाला आहे.

“भाई, गोळी नको चालवू…”

मिळालेल्या माहितीनुसार, व्हिडिओच्या सुरुवातीला चित्रीकरण करणारी व्यक्ती त्या व्यक्तीला पिस्तुलात मॅगझिन कसे घालायचे याबाबत सूचना देताना ऐकू येते. “बटण दाबा, ते आत जाईल,” असे तो सांगत होता. मॅगझिन भरल्यानंतर संबंधित व्यक्ती पिस्तूल कॉक करताना दिसतो. त्यावेळी कॅमेऱ्यामागील व्यक्ती “गोळी चालवू नको भाई,” असेही म्हणताना ऐकू येते.

नेमकं काय घडलं?

काही क्षणांनी त्या व्यक्तीने पिस्तूल छातीच्या डाव्या बाजूला ठेवले. कॅमेऱ्याकडे पाहून तो क्षणभर हसला आणि अचानक ट्रिगर दाबला. गोळी लागल्यानंतर तो तात्काळ कोसळला आणि जखमेतून रक्तस्त्राव सुरू झाला. ही घटना पाहून चित्रीकरण करणारी व्यक्ती घाबरून “भाई, क्या कर दिया तूने?” (मित्रा, तू काय केलंस?) असे ओरडताना ऐकू येते.

पोलिसांचा तपास सुरू

पोलिसांनी मृत व्यक्तीची ओळख पवन अशी पटवली आहे. घटनेनंतर त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेत वापरलेले पिस्तूल हे व्हिडिओ चित्रीत करणाऱ्या व्यक्तीचे परवानाधारक शस्त्र होते. या प्रकरणातील नेमकी कारणे आणि परिस्थिती जाणून घेण्यासाठी पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

“घटनेची माहिती मिळताच पोलीस पथक तात्काळ रुग्णालयात पोहोचले, जिथे दल्लूपुरा गावचा रहिवासी, अंदाजे २८ वर्षीय पवन कुमार याला छातीच्या डाव्या बाजूला गोळी लागलेल्या अवस्थेत बेशुद्ध स्थितीत आणण्यात आले होते. उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले,” असे अधिकाऱ्याने सांगितले.