Delhi AI Summit Chinese Robodog Controversy : दिल्लीमधील इंडिया एआय इम्पॅक्ट समिटमध्ये चिनी रोबोडॉगला स्वतःचं म्हणून सादर करणं नोएडामधील गलगोटिया विद्यापीठाला चांगलंच महागात पडलं आहे. यावरून वाद निर्माण झाला असून गलगोटिया विद्यापीठावर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. एवढंच नाही तर गलगोटिया विद्यापीठाला इंडिया एआय इम्पॅक्ट समिटमधून स्टॉल सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
दरम्यान, चीनच्या रोबोटवरून झालेल्या या वादाला जबाबदार कोण? असा प्रश्न उपस्थित करण्यात आल्यानंतर आता गलगोटिया विद्यापीठाने या वादाचं खापर प्राध्यापकांवर फोडलं आहे. गलगोटिया विद्यापीठाचं म्हणणं आहे की, ‘एका प्रतिनिधीने कॅमेऱ्यासमोर बोलण्याच्या उत्साहात ही खोटी माहिती दिली. माध्यमांशी बोलणाऱ्या कर्मचाऱ्याला अशा प्रकारची चुकीची माहिती देण्याचा अधिकार नव्हता.’
गलगोटिया विद्यापीठाने मागितली माफी
गलगोटिया विद्यापीठाने आज (१८ फेब्रुवारी) प्रसिद्ध केलेल्या प्रेस रिलीजमध्ये म्हटलं की, “एआय समिटमध्ये निर्माण झालेल्या गोंधळाबाबत आम्ही माफी मागतो. आमच्या पॅव्हेलियनमध्ये काम करणाऱ्या एका प्रतिनिधीला सविस्तर माहिती नव्हती आणि कॅमेऱ्यासमोर येण्याच्या उत्साहात तिने चुकीची माहिती दिली.”
वादानंतर विद्यापीठाने काय स्पष्टीकरण दिलं?
सोशल मीडियातून टीका झाल्यानंतर विद्यापीठाने रोबोडॉगची त्यांनी निर्मिती केली नसल्याचे स्पष्ट केले. तसेच, हा रोबोडॉग विद्यार्थ्यांच्या शिकवणीसाठी वापरला जात असल्याचे सांगितले. “आमचे विद्यार्थी रोबोडॉगसोबत प्रयोग करत आहेत. त्याच्या क्षमता, कार्यपद्धती यांचा अभ्यास करत आहेत. गलगोटियाने या रोबोडॉगची निर्मिती केली नाही आणि आम्ही कधीच तसा दावाही केला नाही”, असे विद्यापीठाने एक्सवरुन केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

नेमकं वाद काय?
दिल्लीतील एआय समिटमध्ये गलगोटिया विद्यापीठाने ओरियन रोबोडॉग प्रदर्शित केला. विद्यापीठाने ३५० कोटी एआय कार्यक्रमाअंतर्गत त्याची निर्मिती केल्याचे विद्यापीठाच्या प्राध्यापिका नेहा सिंग एका व्हिडीओत सांगत आहेत. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी देखील हा व्हिडीओ शेअर केला होता. दरम्यान, हा रोबोडॉग चायनीज असल्याचे समोर आले. यानंतर विद्यापीठावर सोशल मीडियातून जोरदार टीका झाली. विरोधकांकडून देखील सरकारवर सडकून टीका केली.
चिनी सोशल मीडियातही व्हायरल
दिल्लीतील हा प्रकार चिनी सोशल मीडियात देखील व्हायरल झाल्याचे दिसून आले. गलगोटिया विद्यापीठाने चिनी रोबोडॉग एआय समिटमध्ये प्रदर्शित केल्याचा व्हिडीओ चायना प्लसवरुन पोस्ट करण्यात आला. सोशल मीडियावर मोठ्या प्रमणावर ट्रोलिंग झाल्यानंतर सरकारने देखील या घटनेची गंभीर दखल घेतल्याचे दिसून आले.
