नवी दिल्ली : दिल्लीतील प्रदूषण नियंत्रणात आणण्यासाठी सरकारी तसेच, खासगी कंपनीतील कर्मचाऱ्यांनी घरबसल्या काम करावे, शनिवार-रविवार टाळेबंदी लागू करावी, राष्ट्रीय राजधानी परिक्षेत्रात बांधकामांवर बंदी घालावी आदी उपायांवर मंगळवारी झालेल्या आपत्कालीन बैठकीत चर्चा झाली. त्यामुळे दोन दिवसांच्या टाळेबंदीचा गांभीर्याने विचार केला जाऊ  शकतो असे मानले जात असले, तरी केंद्र सरकारने अजून कोणताही निर्णय घेतलेला नाही.दिल्ली सरकारने शनिवारी आणि रविवारी दोन दिवस टाळेबंदी लागू करण्याचा प्रस्ताव तयार केला असून सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशावर त्याची अंमलबजावणी अवलंबून असेल, असे राज्याचे पर्यावरणमंत्री गोपाल राय यांनी स्पष्ट केले. दरम्यान, पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश आदी राज्यांमध्ये शेतातील खुंट जाळणीच्या घटनांमुळे दिल्लीतील प्रदूषणात फारशी वाढ झाली नसल्याचा केंद्राचा दावा दिल्ली सरकारने फेटाळला आहे.