नवी दिल्ली : वायू प्रदूषणाच्या विळख्यात सापडलेल्या देशाच्या राजधानीला यंदाच्या वर्षात मोठा दिलासा मिळाला आहे. करोना महासाथीदरम्यान टाळेबंदीचा २०२० चा अपवादात्मक काळ वगळता, गेल्या ८ वर्षांत यंदाच्या जानेवारी ते मे या ५ महिन्यांच्या कालावधीत दिल्लीतील हवा सर्वाधिक शुद्ध आणि स्वच्छ राहिल्याची नोंद झाली आहे.
‘वायू गुणवत्ता व्यवस्थापन आयोगाने’ (सीएक्यूएम) सोमवारी प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, या वर्षी या ५ महिन्यांत दिल्लीचा सरासरी वायू गुणवत्ता निर्देशांक (एक्यूआय) सुधारून २११ वर आला आहे.
दिल्लीतील हवेचा दर्जा सुधारला
‘सीएक्यूएम’ने ‘एक्स’वर दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीतील हवेचा दर्जा सुधारत असून, चांगल्या दर्जाच्या हवेचे दिवसही यंदा वाढले आहेत. मे महिन्यातील हवेची गुणवत्ता देखील गेल्या आठ वर्षांतील दुसऱ्या क्रमांकाची सर्वोत्तम ठरली. यंदा मे महिन्याचा सरासरी वायू गुणवत्ता निर्देशांक १५७ इतका नोंदविण्यात आला. २०२५ मध्ये तो १७०, तर २०२४ मध्ये २२३ इतका होता.
जानेवारी-मे कालावधीतील हवा किती स्वच्छ?
वर्ष सरासरी वायू गुणवत्ता निर्देशांक
२०२६ २११
२०२५ २१४
२०२४ २३१
२०२३ २१३
२०२२ २३८
२०२१ २३५
२०२० १८१
२०१९ २३७
२०१८ २४३
मे महिन्यात हवा किती स्वच्छ?
वर्ष सरासरी वायू गुणवत्ता निर्देशांक
२०२६ १५७
२०२५ १७०
२०२४ २२३
२०२३ १७१
२०२२ २१२
२०२१ १४४
२०२० १४४
२०१९ २२१
२०१८ २१७
‘चांगली ते मध्यम’ हवा असलेले दिवस किती?
(जानेवारी-मे)
वर्ष दिवस
२०२६ ७५
२०२५ ७०
२०२४ ७५
२०२३ ७४
२०२२ ३७
२०२१ ५९
२०२० ९८
२०१९ ५९
२०१८ ४४
