स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येलाच दिल्लीत मोठी खळबळ उडाली आहे. दिल्ली उच्च न्यायालय, दिल्ली विमानतळासह ६ ठिकाणी बॉम्बची धमकी देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. दिल्लीत सध्या १५ ऑगस्टच्या पार्श्वभूमीवर मोठी तयारी सुरू आहे. मात्र, १५ ऑगस्टच्या पूर्वसंध्येलाच अनेक सरकारी कार्यालयांना धमकीचा ईमेल आल्यामुळे दिल्लीत खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे दिल्लीत भीतीचं वातावरण पसरलं आहे.
दिल्ली एअरपोर्ट, उच्च न्यायालयासह ६ ठिकाणी बॉम्बची धमकी आल्यानंतर दिल्ली पोलीस आणि स्थानिक प्रशासन अलर्ट झालं असून चौकशी सुरू करण्यात आली आहे. अद्याप यापैकी कोणत्याही ठिकाणी कोणतीही संशयास्पद वस्तू आढळून आलेली नाही अशी माहिती एका अधिकाऱ्यांनी सांगितली आहे. या संदर्भातील वृत्त इंडियन एक्स्प्रेसने दिलं आहे.
१५ ऑगस्टच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत अनेक ठिकाणी सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आलेली आहे. यातच सहा ६ ठिकाणी बॉम्बच्या धमक्या आल्यामुळे प्रशासन आणखी अलर्ट झालं असून पोलीस, बॉम्ब शोधक व नाशक पथक, अग्निशमन दलाचे जवान आणि इतर आपत्कालीन यंत्रणांचे पथक संबंधित ठिकाणी दाखल झाल्याची माहिती सांगितली जात आहे.
नेमकं धमकी काय आली?
संबंधित आस्थापनांना मिळालेल्या धमकीच्या ईमेलमध्ये ‘दिल्ली खलिस्तान बनेल’ असा उल्लेख करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. या ईमेलमध्ये संभाव्य स्फोटाचाही उल्लेख करण्यात आला आहे. या बरोबरच लाल किल्ला आणि पंतप्रधान यांच्याबाबतही धमकीवजा उल्लेख होता. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचाही या ईमेलमध्ये उल्लेख होता अशी माहिती सूत्रांनी सांगितली आहे.
दरम्यान, ज्या ठिकाणी धमक्या मिळाल्या आहेत, त्यामध्ये जामनगर हाऊस, झंडेवालान इमारत, साकेत येथील एक कार्यालय, दिल्ली कॅन्टोन्मेंटचे एसडीएम कार्यालय आणि आयजीआय विमानतळाचे टर्मिनल ३ यांचा समावेश असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी सांगितली. आता या ई-मेलमधील मजकुराची पोलीस पडताळणी करत आहेत. तसेच धमकी आलेल्या ठिकाणी जाऊन पोलिसांकडून कसून तपासणी करण्यात येत आहे. हा धमकीचा ईमेल कोणी पाठवला? अशा प्रकारच्या धमक्या का देण्यात आल्या? याचा तपास पोलीस करत आहेत.
