दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर (IGI Airport) सुरक्षा तपासणीदरम्यान एक अत्यंत धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका प्रवाशाच्या बॅगेत माकडाची कवटी आढळल्याने विमानतळ परिसरात काही काळ खळबळ उडली. या घटनेनंतर केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाने (CISF) तत्काळ संबंधित प्रवाशाला स्थानिक पोलिसांच्या स्वाधीन केले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हा प्रवासी दिल्लीहून हैदराबादला जाण्याच्या तयारीत होता. विमानतळावर हँड बॅगेजची एक्स-रे तपासणी सुरू असताना CISF कर्मचाऱ्यांना बॅगेत मानवी कवटीसारखी संशयास्पद वस्तू दिसून आली. कर्मचाऱ्यांनी तात्काळ बॅग बाजूला घेऊन प्रवाशाकडे चौकशी केली असता, ती मानवी नसून माकडाची कवटी असल्याचे त्याने सांगितले.
वन्यजीव तस्करीचा संशय; पोलीस तपासाला गती
ही वस्तू वन्यजीवांशी संबंधित असल्याने तसेच वन्यजीव संरक्षण कायद्याचे उल्लंघन किंवा तस्करीचा प्रकार असण्याची शक्यता लक्षात घेऊन CISF ने प्रवाशाला दिल्ली पोलिसांच्या हवाली केले.
दरम्यान, या प्रकरणात अद्याप कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. बॅगेत सापडलेली वस्तू नेमकी कसली आहे, याविषयी वन्यजीव विभागाकडून अधिकृत अहवाल आल्यानंतरच पुढील कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
वन्यजीव विभागाच्या अहवालानंतरच पुढील कारवाई
इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाचे पोलीस उपआयुक्त (DCP IGI) विचित्र वीर यांनी यासंदर्भात माहिती देताना सांगितले, “अशा प्रकारच्या प्रकरणांमध्ये वन्यजीव विभागाचे मत अत्यंत महत्त्वाचे असते. ती वस्तू नेमकी काय आहे आणि ती सोबत बाळगणे कायद्याचे उल्लंघन ठरते का, हे तज्ज्ञांच्या तपासणीनंतरच स्पष्ट होईल. वन्यजीव विभागाचा अहवाल प्राप्त झाल्यानंतरच कायद्यानुसार पुढील योग्य ती कारवाई केली जाईल.”
सध्या पोलीस या प्रवाशाची चौकशी करत असून, वन्यजीव विभागाच्या अहवालाची वाट पाहत आहेत. विमानतळावरील या विचित्र आणि संशयास्पद प्रकारामुळे सुरक्षा यंत्रणा अधिक सतर्क झाल्या आहेत.
