Delhi Airport Plane Collision: दिल्ली विमानतळावर उभ्या असललेल्या अकासा कंपनीच्या विमानाला स्पाईसजेट कंपनीचे विमान धडकल्याने अपघात झाला आहे. स्पाईसजेट कंपनीचे विमान पार्क केले जात असताना विमानाची उजव्या बाजूची पाती उभ्या असलेल्या अकासा कंपनीच्या विमानाला धडकली. यात स्पाईसजेट कंपनीच्या विमानाच्या पातीचे नुकसान झाले आहे. गुरुवारी घडलेल्या या घटनेचा विमानतळ अधिकाऱ्यांकडून तपास केला जात आहे.
दोन्ही विमानांचे नुकसान
मिळालेल्या माहितीनुसार स्पाईसजेट कंपनीचे बी७३७-७०० या विमानच्या उजव्या पातीचे या अपघातात नुकसान झाले आहे. तर, अकासा कंपनीच्या विमानाला डाव्या बाजुच्या स्टॅबिलायझरचे नुकसान झाले आहे. या घटनेनंतर स्पाईसजेट कंपनीच्या अपघातग्रस्त विमानचे पुढील उड्डाण रद्द करण्यात आली आहेत. तर, दिल्ली ते हैदराबाद दरम्यान कार्यरत असणारे अकासा कंपनीचे क्युपी १४०६ विमान दिल्ली विमानतळावर पार्क करण्यात आले होते, असे कंपनीने सांगितले आहे.
अकासा कंपनीचे स्पष्टीकरण
प्राथमिकदृष्ट्या असं दिसतंय की अकासा कंपनीचे विमान विमानतळावर पार्क करण्यात आले होते आणि त्यावेळी दुसरे विमान येऊन त्याला धडकले, अशी अकासा कंपनीच्या प्रवक्त्यांनी माहिती दिली आहे. पण, या अपघातानंतर विमान उभं करुन ठेवावे लागणार आहे. दरम्यान, विमानातील प्रवासी आणी क्रू सुरक्षित असल्याचे कंपनीकडून स्पष्ट करण्यात आले आहे. प्रवाशांसाठी दुसऱ्या विमानाची व्यवस्था करण्यात आल्याचे कंपनीने सांगितले. प्रवाशांची सुरक्षा आमच्यासाठी नेहमीच महत्वाची आहे, असेही अकासाने स्पष्ट केले.
स्पाईसजेट कंपनीच्या विमानाची उड्डाणे रद्द
दिल्ली विमानतळावर विमान पार्क करत असताना विमानाचे नुकसान झाल्याचे स्पाईसजेट कंपनीचे सांगितले आहे. स्पाईसजेट कंपनीचे बी७३७-७०० दिल्ली विमानतळावर पार्क करत असताना १६ एप्रिल रोजी अपघात झाला. यामुळे उजव्या पातीचे नुकसान झाले आहे. या अपघातानंतर विमानाची पुढील उड्डाणे रद्द करण्यात आल्याचे कंपनीने सांगितले. दरम्यान, या अपघाताबाबत संबधित विभागाला माहिती देण्यात आल्याचे दोन्ही कंपन्यांनी सांगतिले. या प्रकरणाची गंभीर दखल घेण्यात आली असून, पुढील तपास केला जात आहे.
