दिल्लीतील रामलीला मैदान परिसरातील फैज-ए-इलाही मशिदीजवळ बुधवारी सकाळी अतिक्रमणविरोधी कारवाईवेळी हिंसाचार उसळला. या वेळी जमावाने केलेल्या दगडफेकीत पाच पोलीस जखमी झाले आहेत.

मंगळवारी रात्री ते बुधवारी सकाळपर्यंत निदर्शने सुरू होती. या वेळी निदर्शकांना पांगविण्यासाठी पोलिसांना बळाचा वापर करावा लागला. या प्रकरणात पोलिसांनी एका अल्पवयीन मुलासह पाच जणांना अटक केली असून अन्य १०-१५ जणांना ताब्यात घेतले आहे.

अतिक्रमणविरोधी कारवाईदरम्यान, मशीद पाडली जात असल्याची समाजमाध्यमावरून अफवा पसरली आणि त्यानंतर लगेचच जमावाने पोलीस आणि एमसीडी (दिल्ली महानगरपालिका) कर्मचाऱ्यांवर दगड आणि काचेच्या बाटल्या फेकल्या, असे पोलिसांनी सांगितले. एमसीडी दिल्ली उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार, मशिदीलगतच्या जमिनीवर आणि तुर्कमान गेट येथील जवळच्या कब्रस्तानवर अतिक्रमणविरोधी कारवाई करीत होते.

कारवाई सुरू असताना शेकडो लोक घटनास्थळी जमले होते. त्यांना समजावल्यानंतर बहुतांश लोक पांगले परंतु काहींनी गोंधळ घातला आणि दगडफेक केली असे पोलिसांनी सांगितले. तर एमसीडीचे उपायुक्त विवेक कुमार यांनी कारवाई दरम्यान डायग्नोस्टिक सेंटर आणि बँक्वेट हॉलसह काही व्यावसायिक प्रतिष्ठाने पाडण्यात आली. मशिदीचे कोणतेही नुकसान झाले नसल्याचे स्पष्ट केले.

पोलिसांचा दावा

– वाद निर्माण करणाऱ्या चित्रफितींपैकी एक चित्रफीत खालिद मलिक नावाच्या व्यक्तीने रेकॉर्ड केली होती, जो लोकांना मोठ्या संख्येने घराबाहेर पडण्याचे आवाहन करत होता. मशीद पाडण्यासाठी बुलडोझर तैनात करण्यात आल्याच्या अफवा पसरल्या, ज्यामुळे परिसरात तणाव वाढला, असे अतिरिक्त पोलीस आयुक्त (मध्य) निधीन वलसन यांनी सांगितले.

पोलिसांनी काही लोकांनी त्यांची ओळख लपवण्यासाठी घातलेले मास्कदेखील जप्त केले आहेत.

-पोलिसांनी घातलेल्या बॉडी कॅमेऱ्यांचे फुटेज आणि ड्रोन कॅमेऱ्यांचेही विश्लेषण करून गुन्हेगारांची ओळख पटवली जात आहे

जमावाला पांगवण्यासाठी अश्रुधुराचा वापर करण्यात आला, त्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आणण्यात आली.

या प्रकरणात अटक केलेल्या पाच जणांची ओळख पटली असून त्यांची नावे मोहम्मद अरीब (२५), मोहम्मद कैफ (२३), मोहम्मद काशिफ (२५), मोहम्मद हमीद (३०) आणि एक १७ वर्षीय मुलगा अशी आहेत.

मोहिमेदरम्यान मशिदीचे कोणतेही नुकसान झाले नसल्याचा दावा अतिरिक्त पोलीस आयुक्तांनी केला.

अतिक्रमणे हटविण्यासाठी ३२ जेसीबींचा वापर

दिल्ली महानगरपालिकेने (एमसीडी) तुर्कमान गेट येथील फैज-ए-इलाही मशिदीजवळील जमिनीवरील अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यासाठी ५० हून अधिक अधिकारी, शेकडो पोलीस, ३२ जेसीबी आणि चार पोक्लेन मशीन तैनात केल्या. उपायुक्त विवेक अग्रवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्ली उच्च न्यायालयाने अतिक्रमण घोषित केलेले एक विवाह हॉल आणि एक दवाखाना मंगळवार आणि बुधवारी मध्यरात्री पाडण्यात आला. इमारतींच्या भिंती नऊ इंचांपेक्षा जास्त जाड असल्याने ही कारवाई आव्हानात्मक होती. अतिक्रमणमुक्त केलेली जमीन अंदाजे ३६,००० चौरस फूट आहे.