पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदी विराजमान होण्यासाठी सज्ज असलेल्या अरविंद केजरीवाल यांनी निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळत असल्याने मतदारांचे आभार मानले आहेत. दिल्लीमधील आपच्या कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांकडून जोरदार सेलिब्रेशन करण्यात आलं. यावेळी अरविंद केजरीवाल यांच्यासोबत त्यांची पत्नी आणि इतर नेते उपस्थित होते. अरविंद केजरीवाल यांनी यावेळी निवडणुकीत दिलेल्या यशाबद्दल मतदारांचे आभार मानत स्टेजवरुनच ‘आय लव्ह यू’ म्हणाले. “दिल्लीकरांनो तुम्ही लोकांनी कमाल केलीत. आय लव्ह यू,” असं अरविंद केजरीवाल यांनी म्हटलं.

हा दिल्लीचा नाही तर भारतमातेचा विजय असल्याचं अरविंद केजरीवाल यांनी यावेळी म्हटलं. “दिल्लीकरांनी तिसऱ्यांदा आपल्या मुलावर विश्वास ठेवला. हा माझा नाही तर दिल्लीकरांचा विजय आहे. त्या प्रत्येक कुटुंबाचा विजय आहे ज्याने मला आपला मुलगा मानून जबरदस्त समर्थन दिलं. स्वस्त वीज, चांगली शिक्षा मिळत असलेल्या त्या प्रत्येक कुटुंबाचा हा विजय आहे,” असं यावेळी अरविंद केजरीवाल यांनी सांगितलं.

“आज देशात नव्या राजकारणाचा जन्म झाला आहे. मत त्यालाच जो शाळा बनवणार, मोहल्ला क्लिनिक बनवणार, जो २४ तास वीज देणार हा संदेश दिल्लीकरांनी दिला आहे. हा पूर्ण देशाचा विजय आहे,” असं अरविंद केजरीवाल म्हणाले आहेत.

आणखी वाचा – Delhi Assembly Election 2020: हा दिल्लीचा नाही तर भारतमातेचा विजय – अरविंद केजरीवाल

आपचे कार्यकर्ते आणि माझ्या कुटुंबाने मला पाठिंबा दिला आहे सांगताना अरविंद केजरीवाल यांनी यावेळी माझ्या पत्नीचा आज वाढदिवस असल्याचं सांगितलं. मी केक खाल्ला आहे तुम्हा सगळ्यांनाही देतो असं मिश्किलपणे यावेळी त्यांनी म्हटलं. दिल्लीच्या नागरिकांनी खूप विश्वासने आपल्याला विजय मिळवून दिला आहे. पुढील पाच वर्ष खूप मेहनत करायची आहे असा निर्धार यावेळी त्यांनी व्यक्त केला.