Who Will Be Delhi CM if BJP Wins : दिल्ली विधानसभा निवडणुकीची आज (८ फेब्रुवारी) मतमोजणी सुरु आहे. या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष आणि आम आदमी पक्षात जोरदार चुरस पाहायला मिळत आहे. सकाळी ११ वाजेपर्यंत समोर आलेल्या आकडेवारीनुसार भाजपा ४० जागांवर आघाडीवर आहे, तर आम आदमी पक्ष ३० जागांवर आघाडीवर आहे. मतमोजणी सुरु होताच भाजपाने सुरुवातीलाच जोरदार आघाडी घेतली आणि बहुमताचा आकडा ओलांडला, तर सत्ताधारी आम आदमी पक्षाने ३० जागांवर आघाडी घेतली होती. त्यामुळे दिल्लीत नेमकं कोणाची सत्ता येणार? हे पुढच्या काही तासांमध्ये स्पष्ट होणार आहे.

दरम्यान, सध्या सकाळी ११ वाजेपर्यंत समोर आलेला कल पाहता भारतीय जनता पक्ष स्पष्ट बहुमत प्राप्त करेल, असं चित्र दिसत आहे. भारतीय जनता पक्ष सध्या आघाडीवर आहे. जर हा कल असाच राहिला तर भारतीय जनता पक्षाचं सरकार दिल्लीत येऊ शकतं. त्यामुळे देशाच्या राजधानीत अर्थात भाजपाचा मुख्यमंत्री कोण असेल? याबाबत आता अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. याबाबत वेगवेगळ्या नावांची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. या पार्श्वभूमीवर दिल्लीत मुख्यमंत्री पदासाठी नेमकं कोणाची नावं चर्चेत आहेत? याविषयी जाणून घेऊयात. यासंदर्भातील वृत्त इंडिया टिव्हीने दिलं आहे.

मुख्यमंत्री पदासाठी कोणाचे नावं चर्चेत?

दुष्यंत कुमार गौतम : दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष आघाडीवर आहे. त्यामुळे दिल्लीत भाजपाची सत्ता येणार असल्याचं चित्र सध्या तरी दिसत आहे. असं झाल्यास भाजपाच्या मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत असलेल्या प्रमुख नावांमध्ये दुष्यंत कुमार गौतम यांचं नाव आघाडीवर आहे. दुष्यंत कुमार गौतम हे करोलबाग विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. ते भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस आहेत. दुष्यंत कुमार गौतम यांनी राज्यसभेचे खासदार म्हणून काम केलेलं आहे.

परवेश वर्मा यांच्या नावाची चर्चा

भाजपाच्या दिल्लीच्या मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत परवेश वर्मा यांच्या नावाचीही चर्चा आहे. परवेश वर्मा यांचे वडील दिल्लीचे माजी मुख्यमंत्री साहिब सिंह वर्मा हे आहेत. परवेश वर्मा हे नवी दिल्ली मतदारसंघातून आपचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांच्या विरोधात निवडणूक लढवत आहेत.

अरविंदर सिंग लवली : अरविंदर सिंह लवली यांचंही नाव मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत आहे. अरविंदर सिंह लवली हे दिल्लीच्या गांधी नगरमधून भाजपाचे प्रतिनिधित्व करतात.

विजेंदर गुप्ता : विजेंदर गुप्ता हे भाजपाचे ज्येष्ठ नेते आहेत. दिल्लीत भाजपाची सत्ता आल्यास विजेंदर गुप्ता हे देखील मुख्यमंत्री पदाचे दावेदार मानले जातात. दिल्लीत आपचे वर्चस्व असतानाही त्यांनी २०१५ आणि २०२० मध्ये निवडणूक जिंकली होती. विजेंदर गुप्ता यांनी दिल्ली विधानसभेत विरोधी पक्षनेते म्हणूनही काम केलेलं आहे. त्यांचा अनुभव पाहता त्यांना मुख्यमंत्री पदाचे दावेदार मानलं जातं.

सतीश उपाध्याय : सतीश उपाध्याय हे मालवीय नगर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. ते भारतीय जनता पक्षाच्या दिल्ली युनिटचे माजी अध्यक्ष आहेत. भाजपाची सत्ता आल्यास दिल्लीच्या मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत सतीश उपाध्याय यांचं नाव चर्चेत आहे.