Delhi Assembly Security Breach : दिल्ली विधानसभेच्या परिसरात एका अज्ञात कारने अचानक व्हीआयपी गेट तोडून आत प्रवेश केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे दिल्लीत एकच खळबळ उडाली आहे. त्यामुळे दिल्ली विधानसभेच्या सुरक्षेबाबत आता प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत.

दिल्ली विधानसभा परिसरातील मुख्य गेटवर अचानक एक अज्ञात कार घुसली. यावेळी या कारने मुख्य गेटला जोराची धडक दिली आणि गेट तोडून आत विधानसभेच्या परिसरात प्रवेश केला. या घटनेमुळे कर्मचारी आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं. मात्र, पुढच्या काही मिनिटांमध्ये ती कार घटनास्थळावरून दिसेनाशी झाली.

दरम्यान, ही अज्ञात कार दिल्ली विधानसभेच्या परिसरात का आली? नेमकं काय घडलं? घटनेनंतर ती गाडी घटनास्थळावरून अचानक कुठे गेली? याचा तपास आता दिल्ली पोलीस करत आहेत. तसेच या तपासासाठी दिल्ली विधानसभा परिसरातील सीसीटीव्हीचा आधार घेतला जात आहे. या संदर्भातील वृत्त एएनआयने दिलं आहे.

दिल्ली विधानसभा परिसरात अशा प्रकारची घटना घडल्यामुळे सुरक्षेबाबत चिंता व्यक्त करण्यात येत आहे. दिल्ली पोलिसांनी त्या कारचा शोध घेण्यासाठी आणि चालकाची ओळख पटवण्यासाठी सीसीटीव्ही फुटेज आणि आणखी उपलब्ध पुराव्यांच्या आधारे तपास सुरू केला आहे.

या बरोबरच अधिकारी दिल्ली विधानसभेच्या प्रवेश मार्गांचा आढावा घेत असून ही कार जेव्हा गेट तोडून आत घुसली तेव्हा गेटवर असलेल्या सुरक्षा रक्षकांसह कर्मचाऱ्यांची चौकशी करत आहेत. या घटनेमुळे विधानसभेच्या सुरक्षेतील त्रुटी समोर आल्या असून आता आणखी कडक उपाययोजना रावण्यात येण्याची शक्यता आहे.