शीखांसदर्भातील वादग्रस्त वक्तव्यावरून अभिनेत्री कंगना रणौतच्या अडचणीत वाढ झालीय. आम आदमी पक्षाचे आमदार आणि दिल्ली विधानसभेच्या शांतता आणि सद्भावना समितीचे अध्यक्ष राघव चड्डा यांनी कंगनाला समन्स पाठवलं आहे. त्यामुळे या प्रकरणात कंगनाला ६ डिसेंबर रोजी दुपारी १२ वाजता समितीसमोर हजर राहावे लागणार आहे. कंगनावर शिख समुदायाविरोधात बदनामीकारक वक्तव्य केल्याचा आरोप आहे.

कंगना रणौत वक्तव्याविरोधात तक्रार दाखल

कंगनाच्या विरोधात दिल्ली शीख गुरुद्वारा व्यवस्थापन समितीद्वारे तक्रार दाखल करण्यात आली आहे. ही तक्रार इन्स्टाग्रामवर शीख समुदायाविरोधात आक्षेपार्ह टिप्पणी केल्याप्रकरणी दाखल करण्यात आली आहे. या समितीने दिलेल्या माहितीनुसार, कंगनाच्या विरोधात दाखल करण्यात आलेली तक्रार ही मंदिर मार्ग पोलीस ठाण्यातील सायबर सेलमध्ये करण्यात आली आहे. या शीख समुदायाच्या मते, कंगनाने जाणीवपूर्वक शेतकरी आंदोलन हे खलिस्तानी आंदोलन असल्याचे वर्णन केले आहे. तसेच तिने शीख समुदायविरोधात वक्तव्य करतेवेळी आक्षेपार्ह आणि अपमानास्पद भाषेचा वापर केला आहे, असे शीख समुदायाचे म्हणणं आहे.

कंगनाने इंस्टाग्राम पोस्टमध्ये काय म्हटलं?

कंगनाने आपल्या इंस्टाग्राम स्टोरीत म्हटलं, “खलिस्तानी दहशतवादी आज शस्त्रास्त्रांच्या बळावर सरकारला प्रभावित करत असतील, पण एका महिलेला विसरायला नको. देशाच्या एकमेवर महिला पंतप्रधानाने त्यांना आपल्या चप्पलेखाली चिरडलं होतं. अशावेळी त्यांच्यामुळे या देशाला किती सहन करावं लागलं ते महत्त्वाचं नाही.”

“इंदिरा गांधींनी स्वतःच्या जीवाची किंमत देऊन यांना डासांप्रमाणे चिरडलं. त्यांनी देशाचे तुकडे होऊ दिले नाही. त्यांच्या मृत्यूनंतर अनेक दशकं झाली तरी त्यांच्या नावाने हे थरथर कापतात. त्यांना असाच गुरू पाहिजे,” असंही कंगनाने सांगितलं.

हेही वाचा : “इंदिरा गांधींनी खलिस्तान्यांना आपल्या चप्पलेखाली डासांप्रमाणे चिरडलं अन्…”, कंगनाच्या नव्या पोस्टवर वाद

कंगनाने तिच्या दुसऱ्या एका इंस्टा स्टोरीत इंदिरा गांधी यांचा फोटो शेअर करत त्याला कॅप्शन दिलं, “देशात खलिस्तानी चळवळ फोफावत असताना इंदिरा गांधी यांची गोष्ट याआधी पेक्षा अधिक कालसुसंगत होत आहे. … लवकरच तुमच्यासाठी आणीबाणी आणेल.”

देशाच्या स्वातंत्र्याबद्दलही कंगनाचं आक्षेपार्ह वक्तव्य

गेल्या ८ नोव्हेंबरला कंगना रणौतला तिच्या चित्रपटातील योगदानाबद्दल पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते कंगनाला हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या पुरस्कार सोहळ्यानंतर कंगनाने ‘टाईम्स नाऊ’ या वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. या मुलाखतीत तिने वादग्रस्त वक्तव्य केले. “देशाला १९४८ मध्ये मिळालेले स्वातंत्र्य हे स्वांतत्र्य नसून ती भीक होती. आपल्याला खरे स्वातंत्र्य हे २०१४ मध्ये मिळाले.”