दिल्लीतील ४० गावांची नावे बदलण्याची मागणी भाजपाने दिल्ली सरकारकडे केली आहे. गुलामगिरीचे प्रतीक असलेल्या या गावांची नावे बदलावी, असे भाजपाचे म्हणणे आहे. चिन्हांकीत केलेल्या गावांची नावे बदलण्याचा प्रस्ताव दिल्ली एमसीडी लवकरच स्वीकारेल आणि दिल्ली सरकारकडे पाठवेल.

भाजपाने दिल्ली सरकारवर आरोप केला आहे की दक्षिण दिल्ली एमसीडीने मोहम्मदपूर गावाचे नाव बदलण्याचा प्रस्ताव पाच महिन्यांपूर्वी सरकारला पाठवला होता, परंतु दिल्ली सरकारने तो थंडबस्त्यात ठेवला आहे.

प्रदेश भाजपा अध्यक्ष आदेश गुप्ता यांनी सांगितले की, केवळ मोहम्मदपूर गावच नाही तर दिल्लीतील अशी ४० गावे आहेत, ज्यांचे नाव बदलण्यास गावकऱ्यांनी सहमती दर्शवली आहे. त्यात प्रामुख्याने हुमायूनपूर, युसूफ सराय, बेर सराई, मसूदपूर, जमरुदपूर, बेगमपूर, सदिला जब, फतेहपूर बेरी, हौज खास, शेख सराय यासह अनेक गावांचा समावेश आहे.

आम आदमी पार्टीचे प्रवक्ते म्हणाले की, “दिल्लीकडे अशा सर्व बाबींसाठी राज्य नामकरण अधिकार आहे. जर असा कोणताही प्रस्ताव प्राप्त झाला असेल तर, त्याचे योग्य पुनरावलोकन केले जाईल आणि संबंधित संस्थेद्वारे योग्य प्रक्रियेनुसार त्यावर कार्यवाही केली जाईल.” तसेच, ते पुढे म्हणाले की, “सरकारने योग्य प्रक्रियेनुसार काम करावे असे भाजपाला वाटत नाही. हा पक्ष गुंडगिरी सुरू करण्यासाठी फक्त संधी शोधत असल्याचे दिसतो.”

दरम्यान, गुप्ता यांनी दावा केला की आप “एखाद्या विशिष्ट समुदायाला खुश करण्याचा” प्रयत्न करत आहे, म्हणूनच ते महम्मदपूर गावाचे नाव बदलून माधवपुरम करण्यासाठी दक्षिण दिल्ली महानगरपालिकेच्या ठरावावर निर्णय घेत नाहीत.”