Delhi blast accused Umar Nabi red EcoSport car found at Haryana farmhouse : दिल्लीतील लाल किल्ला परिसरात झालेल्या स्फोटातील संशयीत उमर नबी याच्या दुसऱ्या एका कारचा पोलिसांकडून शोध घेतला जात होता. दरम्यान हरियाणा पोलिसांना ही लाल रंगाची फोर्ड इकोस्पोर्ट कार अखेर सापडली आहे. ही कार हरियाणातील खांडवली गावातील एका फार्महाऊसवर सापडली आहे. द इंडियन एक्सप्रेसने यासंबंधीचे वृत्त दिले आहे.
ही कार नबी याच्या नावावर रजिस्टर असल्याचे आढळून आल्यानंतर अधिकाऱ्यांनी ही कार शोधून काढण्यासाठी आज दुपारी (बुधवार) अनेक राज्यात अलर्ट जारी केला होता.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ही कार नबीच्या मित्राच्या फार्महाऊसवर सापडली आहे. दरम्यान हे फार्महाऊस ज्याचे आहे त्या नबीच्या मित्राला ताब्यात घेण्यात आले असून त्याची चौकशी सुरू आहे. फॉरेन्सिक आणि बॅलेस्टिक तज्ज्ञ त्या कारची तपासणी करत आहेत, असेही सूत्रांनी सांगितले.
स्फोटाच्या वेळी नबी जी i20 कार चालवत होता ती कार पुलवामा येथील एका प्लंबरच्या नावावर रजिस्टर असल्याचे आढळून आले होते. त्या प्लंबरलाही पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. तसेच लाल किल्ल्याजवळ स्फोट झाला तेव्हा त्या कारमध्ये ६० किलोपेक्षा जास्त अमोनियम नायट्रेट होते, असे पोलिसांचे म्हणणे असल्याचे सूत्रांनी सांगितले.
