पीटीआय, नवी दिल्ली
दिल्ली बॉम्बस्फोटाप्रकरणी उत्तर प्रदेशात जम्मू आणि काश्मीरमधील एका वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्राध्यापकासह हृदयरोग अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्याला ताब्यात घेण्यात आले आहे. देशभरातील चार शहरांमध्ये आंतरराज्यीय ‘व्हाईट-कॉलर टेरर’ प्रारुपाद्वारे आणखी हल्ले करण्याची योजना होती, असेही पोलीस तपासातून समोर आले आहे. सोमवारी रात्री लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोटात १३ जणांचा मृत्यू आणि अनेक जण जखमी झाले होते.
‘दहशतवादी मॉड्युल’प्रकरणात अटक करण्यात आलेले आठ संशयित चार शहरांमध्ये स्फोट घडवण्याचा विचार करत होते. त्याअंतर्गत प्रत्येक शहरात दोन-दोन गटांत जाण्याची योजना आखली जात होती, असे पोलीस सूत्रांनी सांगितले. अल फलाह विद्यापीठ आवारातील डॉ. मुझम्मिल (खोली क्र. १३) आणि डॉ. उमर (खोली ४) यांच्या खोल्यांमधून सापडलेल्या वह्यांमध्ये ८ ते १२ नोव्हेंबर दरम्यानच्या अनेक सांकेतिक नोंदी, नावे आणि संख्यात्मक क्रम होते, ज्यातून हल्ल्यांचे तपशीलवार नियोजन समोर येत होते. त्यांनी स्फोटके साठवण्यासाठी भाड्याने घरे घेतली होती, असेही पोलीस सूत्रांनी सांगितले.
हापूरच्या जीएस वैद्यकीय महाविद्यालयामध्ये प्रसूतिशास्त्राचे सहाय्यक प्राध्यापक डॉ. फारुख यांला बुधवारी रात्री दिल्ली पोलिसांनी महाविद्यालय आवारातून ताब्यात घेतले होते. त्यानंतर उत्तर प्रदेश दहशतवादविरोधी पथकाने येथील वैद्यकीय महाविद्यालयातील डॉ. मोहम्मद आरीफ (३२) याला ताब्यात घेतले. तो राज्य शासनातर्फे चालवल्या जाणाऱ्या गणेश शंकर विद्यार्थी मेमोरिया महाविद्यालयात हृदयरोगविषयक अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्षात शिकत होता. आरीफ हा मूळचा काश्मीरमधील अनंतनाग येथील रहिवासी असून स्फोटातील आरोपी डॉ. शाहीन सईद यांच्याशी तो संपर्कात होता. नझिराबादमधील अशोकनगर भागातील आरीफ याच्या घरावरही ‘एटीएस’ने छापा टाकून त्याचा मोबाइल आणि लॅपटॉप जप्त केला.
‘अल फलाह’ला नोटीस
– दिल्ली स्फोटानंतर चर्चेत आलेल्या अल फलाह विद्यापीठाने संकेतस्थळावर बनावट प्रमाणपत्र टाकल्याप्रकरणी राष्ट्रीय मूल्यांकन आणि मान्यता परिषदेने (नॅक) विद्यापीठाला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. या विद्यापीठाला परिषेदेने कोणतेही मूल्यांकन वा मान्यता दिलेली नाही, वा त्यासाठी कोणत्याही प्रकारचा अर्ज विद्यापीठाने केलेला नाही, असे ‘नॅक’ने स्पष्ट केले.
– विद्यापीठाच्या सर्व नोंदींचे न्यायवैद्यक लेखापरीक्षण करण्याचे आदेश सरकारने गुरुवारी दिले आहेत. शिवाय सक्तवसुली संचालनालय (ईडी) आणि इतर आर्थिक तपास यंत्रणांना विद्यापीठाच्या आर्थिक व्यवहारांच्या तपासणीचे आदेश दिल्याचे सूत्रांनी सांगितले. तत्पूर्वी तसेच सायंकाळी ‘असोसिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटीज’ने (एआययू) विद्यापीठाचे सदस्यत्वही निलंबित केले आहे.
अल फलाह विद्यापीठात संशयित कार
चंडिगड : दिल्लीतील स्फोटाशी संबंधाचा संशय असलेली आणखी एक कार ‘अल फलाह’ विद्यापीठात आढळून आल्याचे पोलिसांनी गुरुवारी सांगितले. ‘जम्मू आणि काश्मीर पोलिसांकडून धौज येथील अल फलाह विद्यापीठात संशयित ‘मारुती ब्रीझा’ कारची चौकशी केली जात आहे,’ अशी माहिती फरिदाबाद पोलिसांनी दिली. विद्यापीठाच्या वाहनतळात हरियाणा राज्यातील नोंदणी असलेली ही कार आढळून आल्याचे सूत्रांनी सांगितले. या कारसह विद्यापीठ आवारातील अन्य वाहनांची तपासणी आणि त्यांच्या मालकांची पडताळणी केली जात असल्याचेही सूत्रांनी सांगितले. यापूर्वी स्फोटाशी संबंधित लाल रंगाची ‘फोर्ड इकोस्पोर्ट’ कार पोलिसांनी फरिदाबाद जिल्ह्यातील खंदावली येथून जप्त केली होती.
स्वित्झर्लंडमधील अॅपचा वापर
सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमधील ५० हून अधिक फुटेजची पडताळणी करून दिल्ली पोलिसांनी डॉ. उमर नबी यांच्या शेवटच्या तासांतील हालचालींची
पुनर्रचना केली आहे. तसेच डॉ. नबी, डॉ. मुझम्मिल अहमद गनी आणि डॉ. शाहीन शाहिद या तिघा संशयितांनी दहशतवादी कटाशी संबंधित त्यांच्या कारवायांचे नियोजन आणि समन्वय करण्यासाठी स्वित्झर्लंडमधील ‘एन्क्रिप्टेड मेसेजिंग अॅप’चा वापर केला होता, असेही तपासकर्त्यांना आढळून आले आहे.
२६ लाखांहून अधिक रोख रक्कम जमा
पोलिसांनी सांगितले की चारही संशयितांनी २६ लाख रुपयांहून अधिक रोख रक्कम जमा केली होती, जी कारवाईसाठी उमरला देण्यात आली होती.
जमा झालेल्या पैशांतून गुरुग्राम, नूह आणि जवळच्या शहरांमधील पुरवठादारांकडून उमरने सुमारे २६ क्विंटल ‘एनपीके’ (नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅशियम) खत खरेदी केले होते, ज्याची किंमत अंदाजे ३ लाख रुपये होती. इतर रसायनांसह मिसळलेले हे खत सामान्यतः सुधारित स्फोटक उपकरणे (आयईडी) तयार करण्यासाठी वापरले जाते. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, स्फोटापूर्वी डॉ. उमर दिल्लीला जात असताना त्यांच्या गाडीच्या मागच्या आसनावर एक मोठी बॅग ठेवण्यात आली होती, ज्यामध्ये स्फोटके असल्याचे मानले जाते.
श्रीनगर-दिल्ली विमानाचे तिकीट हस्तगत
सहारनपूर येथून गेल्या आठवड्यात अटक केलेल्या जम्मू-काश्मीर येथील डॉ. आदिल अहमद याने ३१ ऑक्टोबर रोजी श्रीनगरहून दिल्लीला विमानाने प्रवास केल्याचे त्याच्या विमान तिकिटावरून स्पष्ट झाले आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आदिलचे नाव आणि प्रवासाची दिनांक याचा उल्लेख असलेले विमानाचे तिकीट बुधवारी सहारनपूर येथील अमन विहार कॉलनीतील भाडेतत्वावर असलेल्या घराबाहेर आढळून आले. हे तिकीट हस्तगत केले असून, न्यायवैद्यकीय तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे. यामुळे आदिलच्या हालचाली आणि दिल्ली बॉम्बस्फोटाशी त्याच्या संभाव्य संबंधाबद्दल प्रश्न उपस्थित होत आहेत. आदिल राजधानीत किती काळ राहिला आणि या काळात तो कोणाला भेटला हे शोधण्याचा प्रयत्न सुरू आहे.
‘सीसीटीव्ही’तून कारच्या मार्गाचा उलगडा
नवी दिल्ली : दिल्ली स्फोटातील प्रमुख आरोपी डॉ. उमर नबी याच्या कारच्या हालचाली तपासण्यासाठी दिल्ली पोलिसांनी आतापर्यंत ५० सीसीटीव्ही चित्रीकरणे हस्तगत केले आहे. त्याद्वारे स्फोटाच्या आदल्या रात्री हरियाणातील फरिदाबाद येथून निघाल्यापासून लाल किल्ल्याजवळ येईपर्यंत उमरच्या गाडी मार्गाचा उलगडा पोलिसांनी केला आहे. दिल्ली-मुंबई एक्स्प्रेसवेवरून हुंदाई आय २० गाडीतून केलेल्या प्रवासात उमर काही ठिकाणी धाब्यावर खाण्यासाठी थांबला होता. दिल्लीत प्रवेश करण्याआधीची रात्र त्याने गाडीतच घालवली. दुसऱ्या दिवशी सोमवारी त्याने दिल्लीत बदरपूर सीमेकडूनच दुसऱ्यांदा प्रवेश केला. त्याने आपल्या प्रवासात सकाळी ८ ते दुपारी ३ वाजेपर्यंत दिल्लीतील अनेक भागांत वळसे घातले. या वेळी त्याने असफ अली मार्गावर असलेल्या मशिदीत प्रार्थनाही केली. अखेरीस ३.१९ ला त्याने आपली गाडी लाल किल्ल्याजवळ उभी केली, असे दिल्ली पोलिसांच्या तपासात स्पष्ट झाले आहे.
दुकानाच्या छतावरून मानवी अवशेष हस्तगत
दिल्ली स्फोटाच्या घटनास्थळाजवळील एका दुकानाच्या छतावर गुरुवारी एका हाताचा तुटलेला भाग सापडला. जैन मंदिरामागे हे दुकान असून पोलिसांनी कडक बंदोबस्तात येथील मानवी अवशेष भाग ताब्यात घेतला. तो आता न्यायवैद्यक तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे. या स्फोटात १२ जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. हा मानवी अवशेष त्यापैकीच कोणाचा आहे की अन्य कोणाचा, हे तपासणी अहवालानंतरच स्पष्ट होईल, असे पोलिसांनी सांगितले.
गुन्हेगारांना कठोर शिक्षा : अमित शहा
अहमदाबाद : दिल्ली बॉम्बस्फोटातील गुन्हेगारांना शक्य तितकी कठोरातील कठोर शिक्षा दिली जाईल. त्याद्वारे जगाला असा संदेश देऊ की, कोणीही अशा हल्ल्याचे पुन्हा कधीही धाडस करणार नाही, असा स्पष्ट इशारा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी गुरुवारी दिला. गुजरातच्या मेहसाना जिल्ह्यातील एका शाळेच्या उद्घाटन कार्यक्रमात शहा बोलत होते. ‘ज्यांनी दिल्लीतील हा भीषण स्फोट घडवला आणि जे या स्फोटामागे आहेत, त्यांना न्याययंत्रणेसमोर आणले जाईल आणि शक्य तितके कठोरातील कठोर शासन केले जाईल. यासाठी केंद्र सरकार आणि गृह मंत्रालय वचनबद्ध आहे’, असे शहा यांनी अधिकृत प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
काँग्रेसची सर्वपक्षीय बैठकीची मागणी
दिल्ली स्फोटाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वपक्षीय बैठक आयोजित करावी, अशी मागणी काँग्रेसने केली आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भविष्यातील असा कोणताही हल्ला हा ‘युद्ध कृत्य’ म्हणून हाताळण्याचे नवे धोरण सरकारने जाहीर केले होते. त्यानुसारच दिल्ली स्फोटाच्या प्रकरणाचा विचार करण्यात येत आहे ना, असा सवालही काँग्रेसने केला. संसदेच्या १ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनाचा कालावधी वाढवून दिल्ली स्फोटाच्या मुद्द्यावर विशेष चर्चा करण्यात यावी, असेही काँग्रेसच्या माध्यम आणि प्रसिद्धी विभागाचे प्रमुख पवन खेरा यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
