नवी दिल्ली : दिल्लीचे सचिवालय, विधानसभा, लाल किल्ला आणि दोन शाळांना सोमवारी ईमेलद्वारे बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली. तपासाअंती ही धमकी म्हणजे अफवा असल्याचे जाहीर करण्यात आले, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. ‘खलिस्तान नॅशनल आर्मी’ने या धमक्या दिल्याचे सूत्रांनी सांगितले.
दिल्ली अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्याने सांगितले की, दिल्ली सचिवालय, धौला कुआ येथील ‘दिल्ली आर्मी पब्लिक स्कूल’ आणि लोधी मार्गावरील ‘एअर फोर्स बाल भारती स्कूल’ या इमारतींना बॉम्बच्या धमक्या मिळाल्या. त्याशिवाय, दिल्ली विधानसभा आणि अध्यक्षांच्या अधिकृत ईमेल आयडींवरही धमकी देणारे ईमेल प्राप्त झाले. या ईमेलमध्ये ‘दिल्ली बनेगा खलिस्तान’ असे लिहिले होते. पुढील तीन दिवसांमध्ये दिल्ली आर्मी स्कूल, लाल किल्ला आणि मेट्रो येथे बॉम्बस्फोट होतील.
धमकीचे ईमेल प्राप्त झाल्यानंतर दोन्ही शाळांच्या प्रशासनाने अधिकाऱ्यांना सकाळी माहिती दिली, असे एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. त्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून शाळांचे आवार रिकामे करण्यात आले आणि कसून तपासणी करण्यात आली. मात्र, काहीही संशयास्पद आढळले नाही आणि ती अफवा असल्याचे जाहीर करण्यात आले.
दिल्ली आणि इतर राज्यांमधील विविध शाळा, न्यायालये आणि अन्य इमारतींमध्ये तसेच विमानांमध्ये बॉम्ब असल्याच्या धमक्या देण्याच्या प्रकारांमध्ये गेल्या काही महिन्यांमध्ये लक्षणीयरित्या वाढ झाली आहे.
