Indigo Flight Emergency Landing: गोव्याहून दिल्लीला जाणाऱ्या इंडिगोच्या विमानातील इंजिनमध्ये बिघाड झाल्याची सूचना मिळताच या विमानाचे गोवा विमानतळावर सुरक्षित आपत्कालीन लँडिंग करण्यात आले आहे. पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार, इंडिगोच्या 6E 2102 या विमानाने मंगळवारी सकाळी दिल्लीसाठी उड्डाण घेतले होते. मात्र काही वेळातच विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड असल्याची सूचना मिळाली. यानंतर गोव्याच्या मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावर त्याचे लँडिंग करण्यात आले.

नेमके काय घडले?

द इंडियन एक्सप्रेसने पीटीआयच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, उत्तर गोव्यातील मोपा विमानतळाहून सकाळी ९ वाजून २० मिनिटांच्या आसपास सदर विमानाने उड्डाण घेतले होते. मात्र काही वेळातच इंजिनमध्ये बिघाड असल्याचे लक्षात आल्यानंतर विमान पुन्हा विमानतळाकडे वळवण्यात आले.

या वृत्तात पुढे म्हटले की, विमानाचे लँडिंग सुरक्षितरीत्या करण्यात आले असून सर्व २२९ प्रवासी सुखरूप आहेत. काही वेळातच प्रवाशांसाठी इतर पर्यायी विमानाची व्यवस्था उपलब्ध करून दिली जाणार आहे.

पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार विमानातील सर्व २२९ प्रवासी सुखरूप आहेत.

इंडिगोने काय म्हटले?

“आज उत्तर गोव्याहून दिल्लीला जाणाऱ्या इंडिगो फ्लाइट 6E 2102 मध्ये उड्डाणानंतर लगेचच एक तांत्रिक अडचण आढळून आली. एसओपीनुसार, संबंधित अधिकाऱ्यांना माहिती देण्यात आली आणि वैमानिकांनी विमान परत मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावर सुरक्षितपणे उतरवले. विमानाची सध्या देखभाल तपासणी सुरू असून, सर्व आवश्यक परवानग्या मिळाल्यानंतर ते पुन्हा सेवेत दाखल होईल”, अशी माहिती इंडिगोच्या प्रवक्त्यांनी दिली आहे.

बातमी अपडेट होत आहे…