Delhi Brothers Killed in Firing: रेस्तराँमध्ये जेवण केल्यानंतर रात्री दुचाकीवरून घरी जाणाऱ्या भावंडांची भर रस्त्यात गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे. ईशान्य दिल्लीतल्या चौहाण बांगर भागात सोमवारी रात्री ही घटना घडली. हल्लेखोरांनी हत्या करण्यासाठी अत्याधुनिक व विदेशी पिस्तूलचा वापर केला. दुसऱ्या एका दुचाकीवरून आलेल्या तीन जणांनी दोघा भावांवर ४८ गोळ्या झाडल्या. मोहम्मद फाजिल (वय ३१) व नदीम (वय ३३) अशी या हल्ल्यात मृत्यू झालेल्या दोघा भावांची नावे आहेत. दरम्यान, या प्रकरणी अद्याप अटक करण्यात आलेली नाही, अशी माहिती पोलिसांनी दिली.

फाजिल व नदीम हे दोघे त्यांच्या आईबरोबर रेस्तराँमध्ये जेवायला गेले होते. त्यानंतर रात्री १.४० वाजण्याच्या सुमारास दुचाकीवरून घरी परतत असताना एका दुसऱ्या दुचाकीवरून तीन जण आले. त्या तिघांनी फाजील व नदीम यांच्यावर बेछूट गोळीबार सुरू केला. त्यात दोघांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, या हल्ल्यात फाजिल व नदीम यांचा चुलत भाऊ असद कुरेशी सहभागी असल्याचे पोलिसांनी सांगितले. असद कुरेशीला एका हत्या प्रकरणात अटक झाली होती. काही दिवसांपूर्वी तो तुरूंगातून बाहेर आला. नदीमने पोलिसांना माहिती दिल्याने आपल्याला अटक झाली, असा संशय असदला होता, अशी माहिती पोलिसांनी दिली.

असदने दिली होती धमकी

या प्रकरणी फाजिल व नदीम यांचा मोठा भाऊ वसीम याने प्रतिक्रिया दिली आहे. वसीम म्हणाला, “असद आमच्या घराजवळच राहतो. हल्ला झाला तेव्हा तो तिथे उपस्थित होता. त्याने याआधी आम्हाला धमकी दिली होती. त्यानंतर त्याने त्याच्या कुटुंबासमोर आम्हाला कोणतीही इजा पोहचवणार नाही, अशी हमी दिली होती. परंतु, त्याने अखेर माझ्या भावांची हत्या केली.” दरम्यान, असद कुरेशी हा गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेला आरोपी असल्याचे पोलिसांनी सांगितले.

४८ गोळ्या झाडल्या

रेस्तराँमधून घरी जात असलेल्या फाजिल व नदीम यांच्यावर दुसऱ्या एका दुचाकीवरून आलेल्या तिघांनी ४८ गोळ्या झाडल्या. त्यापैकी २० गोळ्या फाजीलला तर १५ गोळ्या नदीमला लागल्याचे वैद्यकीय तपासात समोर आले आहे. या हल्ल्यात आरोपींनी अत्याधुनिक व विदेशी बंदुक वापरल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, नदीम व आरोपी असद कुरेशी यांच्यात व्यावसायिक कारणांवरून वाद सुरू होता. आरोपी असद कुरेशी हा बेकायदा बंदुक विक्री करत असल्याची माहिती पोलिसांनी दिली. नदीम देखील बेकायदा बंदुक विक्रीत सहभागी होता का, याचा तपास पोलीस करत आहेत. दरम्यान, दोन भावांच्या हत्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी फरार आहेत. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.