पीटीआय, नवी दिल्ली
ईशान्य दिल्लीतील शक्तिविहार परिसरात शनिवारी पहाटे चारमजली इमारत कोसळून ११ जणांचा बळी गेला. पहाटे तीनच्या सुमारास मुस्ताबाद परिसरात झालेल्या या दुर्घटनेत अन्य ११ जण जखमी झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी या घटनेबाबत दु:ख व्यक्त करत चौकशीचे आदेश दिले आहेत.

राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल, अग्निशमन दल, दिल्ली पोलीस तसेच इतर स्वयंसेवक सुमारे १२ तास चाललेल्या बचावकार्यात सहभागी झाले. त्यांना ढिगाऱ्याखालून ११ जणांना बाहेर काढण्यात यश आले. सर्व जखमींना जीटीबी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या २० वर्षे जुन्या इमारतीमध्ये एकूण २२ जण राहत होते, त्यापैकी बहुसंख्य कुटुंबे आहेत. इमारतीचे मालक तेहसीन आणि त्यांच्या कुटुंबामधील अन्य सहा जणांचा मृतांमध्ये समावेश आहे. इमारतीच्या तळमजल्यावरील दोन ते तीन दुकानांमध्ये बांधकाम सुरू असल्याने इमारत कोसळली असावी असा अंदाज पोलिसांमधील सूत्रांनी व्यक्त केला. तर, इमारतीच्या भिंतींमध्ये अनेक वर्षांपासून सांडपाणी झिरपत असल्याने त्याचा पाया कमकुवत होऊन इमारतीला तडे गेले होते असे सलीम अली या रहिवाशाने सांगितले.

माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि आतिशी यांनीदेखील या घटनेबद्दल दु:ख व्यक्त केले. इमारत कोसळत असताना भूकंपासारखे हादरे बसले असे आजूबाजूच्या इमारतींमधील रहिवाशांनी सांगितले. तळमजल्यावर एका नव्या दुकानाचे काम सुरू असल्याने दुर्घटना घडल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. याखेरीज शेजारील चार ते पाच इमारतींच्या स्थितीबाबतही त्यांनी चिंता व्यक्त केली.

आम्हाला वाटले आमच्या घरावर काहीतरी आदळले आहे पण आम्ही बाहेर पाहिले तेव्हा आमच्याशेजारील संपूर्ण इमारत कोसळून ढिगारा तयार झाला होता. – स्थानिक