Delhi Satya Niketan Building Collapse : दिल्लीत इमारत कोसळण्याच्या दुर्घटनेत अनेकांचा मृत्यू झाला, तर अनेकजण जखमी झाले. मात्र, पश्चिम बंगालमधील १८ वर्षीय विद्यार्थ्याचा जीव एका छोट्याशा निर्णयामुळे वाचला. मोतीलाल नेहरू कॉलेजमध्ये बी.ए.च्या पहिल्या वर्षात शिकणारा सना वराश इमारत कोसळण्याच्या अवघ्या १५ मिनिटे आधी बाहेर पडला होता. घरात पाणी येत नसल्याने तो जवळच राहणाऱ्या मित्राच्या घरी गेला आणि काही वेळातच तो राहत असलेली इमारत जमीनदोस्त झाली. या दुर्घटनेबद्दलचे सविस्तर वृत्त दी इंडियन एक्सप्रेसने दिले आहे.
पाणी गेलं अन् मित्राच्या घरी जाण्याचा निर्णय
पश्चिम बंगालमधील अलीपुरद्वार जिल्ह्यातील फालाकाटा येथील वराश दिल्लीतील या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर दोन खोल्यांच्या घरात राहत होता. रविवारी दुपारच्या सुमारास झोपेतून उठल्यानंतर त्याला घरात पाणीपुरवठा नसल्याचे लक्षात आले. त्यामुळे तो जवळच राहणाऱ्या मित्राच्या घरी फ्रेश होण्यासाठी निघाला. त्याचा हा निर्णय काही मिनिटांतच त्याचा जीव वाचवणारा ठरला.
“सकाळपासून मला बेसमेंटमधून काही आवाज ऐकू येत होते. मी मित्राला गमतीनंही विचारलं होतं, ‘ही इमारत कोसळेल का?’ ” असे वराशने सांगितले.
जुन्या इमारतीबाबत आधीपासूनच भीती
इमारतीच्या खोल्यांचे अलीकडे नूतनीकरण करण्यात आले होते. मात्र, इमारत जुनी होती, असे वराशने सांगितले. तिसऱ्या मजल्यावरील त्याच्या खोलीकडे जाणारा जिनाही अत्यंत अरुंद आणि जीर्ण होता. तो सतत ओलसर राहत असे. “मी मित्रांना नेहमी म्हणायचो की, या जिन्यावरून पडून एक दिवस माझा मृत्यू होईल,” असे वराशने सांगितले.
दरमहा १४ हजार रुपये भाडे
प्रत्येक मजल्यावर दोन फ्लॅट होते. आपल्या खोलीसाठी तो दरमहा १४ हजार रुपये भाडे देत होता. त्यामध्ये वीजबिलाचा समावेश नव्हता. फ्लॅटमधील इतर रहिवाशांसोबत त्याला कॉमन बाथरूम वापरावे लागत होते. एका खोलीत दोन बेड, दोन कपाटे, दोन खुर्च्या आणि दोन टेबल ठेवले की, जवळपास संपूर्ण जागा व्यापली जात होती, असे त्याने सांगितले.
“ही जागा १४ हजार रुपये भाड्यासाठी अजिबात योग्य नव्हती. माझे वडील इलेक्ट्रिशियन आहेत आणि माझ्या शिक्षणाचा व राहण्याचा खर्चही कुटुंबासाठी जास्त आहे,” असे वराशने सांगितले.
जीव वाचला, पण सर्व सामान ढिगाऱ्याखाली
इमारत कोसळल्याने वराशचा जीव वाचला असला तरी त्याचे जवळपास सर्व सामान ढिगाऱ्याखाली गेले आहे. त्याचा लॅपटॉप, हेडफोन, कपड्यांनी भरलेल्या दोन सुटकेस आणि महत्त्वाची कागदपत्रे इमारतीच्या ढिगाऱ्याखाली आहेत. त्यामध्ये त्याचे बारावीचे प्रमाणपत्र, सीयूईटी स्कोअर कार्ड, आधार कार्ड व मेट्रो कार्ड यांचाही समावेश आहे.
सध्या वराश ज्या मित्राच्या घरी गेला होता, त्याच्यासोबत राहणार आहे. दरम्यान, त्याचे दोन फ्लॅटमेट्स नितीश आणि नीरज यांच्यावर एम्सच्या ट्रॉमा सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत. अवघ्या काही मिनिटांच्या फरकाने वराशने मृत्यूला हुलकावणी दिली. घरातील पाणीपुरवठा बंद असल्याने बाहेर पडण्याचा घेतलेला साधा निर्णय त्याच्यासाठी जीवदान ठरला.
