Delhi Building Collapse breaking updates: दिल्लीतील सत्य निकेतन भागात रविवारी दुपारी एक पाच मजली निवासी इमारत कोसळून अनेक जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. दिल्ली अग्निशामक दलाच्या अधिकाऱ्यांसह विविध पथके तातडीने घटनास्थळी पोहोचली असून बचाव कार्य सुरू करण्यात आले आहे. इमारतीत तळमजल्यावर काम सुरू असातना संबंधित अपघात घडला असावा, अशी शक्यता न्यू दिल्ली म्युनिसिपल काऊन्सिलचे उपाध्यक्ष कुलजीत सिंह चहल यांनी वर्तवली.

दक्षिण-पश्चिम दिल्लीचे पोलीस उपायुक्त अमित गोयल यांनी सांगितलं की, “दुपारी सुमारे १ वाजून ३४ वाजता नानकपुरा गुरुद्वाजवळील एक इमारत कोसळल्याची माहिती देणारा पीसीआर कॉल मिळाला. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचे पथकही घटनास्थळी पोहोचले असून मदत व बचाव कार्य वेगाने सुरू आहे.” पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बचाव कार्यासाठी अग्निशामक दलाच्या किमान आठ गाड्या घटनास्थळी पाचारण करण्यात आल्या आहेत. ही इमारत एक वसतिगृह असून तिथे विद्यार्थी भाड्याने राहत होते.

नागरिकांकडूनही ढिगारा उपसण्याचं काम

एका अधिकाऱ्याने सांगितलं की, “इमारत कोसळल्यामुळे आसपास पार्क केलेली अनेक वाहनेही दबून निकामी झाली आहेत.” बचाव कार्याच्या दृश्यांमध्ये स्थानिक नागरिकही अधिकाऱ्यांना ढिगारा उपसण्यास मदत करताना दिसत आहेत. काही जणांना सुखरूप बाहेर काढून जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मात्र, अजूनही अनेक लोक ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती एका पोलीस अधिकाऱ्याने व्यक्त केली.

डीसीपी अमित गोयल पुढे म्हणाले, “सध्या ढिगाऱ्याखाली नेमके किती लोक अडकले आहेत याची अचूक माहिती मिळालेली नाही. आतापर्यंत दोघांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले आहे.”

तर, सत्य निकेतन इमारत दुर्घटनेवर एनडीएमसीचे उपाध्यक्ष कुलजीत सिंह चहल म्हणाले, “…असे दिसून येत आहे की सध्याच्या संरचनेत तळघर (बेसमेंट) खुले करण्यासाठी काम सुरू होते. ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे. मी स्थानिक आमदार अनिल शर्मा यांच्याशी बोललो असून ते सध्या घटनास्थळी उपस्थित आहेत. एमसीडीची संपूर्ण टीम बचावकार्यात गुंतली आहे. दिल्ली सरकार आणि एमसीडी सर्व आवश्यक मदत पुरवत आहेत. आम्ही ईश्वराकडे आत अडकलेल्या सर्वांच्या सुरक्षिततेसाठी प्रार्थना करतो आणि याला कारणीभूत असलेल्यांवर सरकार कडक कायदेशीर कारवाई करेल याची खात्री देतो.”

मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी एका निवेदनात म्हटलं आहे की, “आर. के. पुरममधील सत्य निकेतन येथे घडलेल्या इमारत दुर्घटनेबद्दल मी तीव्र चिंता व्यक्त करते. डीडीएमए, एनडीआरएफ, दिल्ली अग्निशामक दल, दिल्ली पोलीस, एमसीडी, कॅट्स आणि नागरी संरक्षण दलाची पथके युद्धपातळीवर बचाव कार्य करत आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून शेजारील इमारत रिकामी करण्यात आली आहे. अडकलेल्या लोकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी आणि बाधित कुटुंबांना तात्काळ मदत देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून असून सर्व संबंधित यंत्रणा एकमेकांच्या समन्वयाने काम करत आहेत. प्रत्येक नागरिकाची सुरक्षा आणि कल्याण हीच आमची सर्वोच्च प्राथमिकता आहे.”

सत्य निकेतन भागातील दुसरी घटना

यापूर्वी २०२२ मध्येही सत्य निकेतन भागात अशीच एक दुर्घटना घडली होती, ज्यामध्ये दोघांचा मृत्यू झाला होता आणि अनेक जण जखमी झाले होते. त्यावेळी दुरुस्तीचं काम सुरू असलेल्या एका तीन मजली घराचा स्लॅब (छत) दुपारी सव्वा एकच्या सुमारास कोसळला होता, ज्यात सहा मजूर अडकले होते. दिल्ली अग्निशामक दल, दिल्ली पोलीस आणि एनडीआरएफच्या पथकांनी तासनतास ढिगारा उपसून त्यांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले होते.