Delhi Bus Gang Rape Investigation: राजधानी दिल्लीत मंगळवारी घडलेल्या एका घटनेमुळे पुन्हा एकदा २०१२ साली घडलेल्या निर्भया बलात्कार प्रकरणाच्या भीषण आठवणी ताज्या झाल्या. कामावरून परतणाऱ्या एका महिलेला जबरदस्तीने बसमध्ये नेऊन तिच्यावर बसचा ड्रायव्हर व कंडक्टर यांनी बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यासंदर्भात पोलिसांनी तातडीने गुन्हा दाखल केला असून संबंधित ड्रायव्हर व कंडक्टरला अटक केली आहे. या प्रकरणाचा सविस्तर तपास दिल्ली पोलीस करत आहेत. बसच्या फॉरेन्सिक रिपोर्टचादेखील आरोपपत्रात समावेश करण्यात येणार असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे.

दिल्लीत बसमध्ये महिलेवर बलात्कार

इंडिया टुडेनं दिलेल्या वृत्तानुसार, सदर घटना ही १२ मे रोजी घडली. पोलिसांकडून यासंदर्भात गुरुवारी माहिती मिळाली असून या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकारानंतर पीडित महिलेनं थेट राणीबाग पोलीस स्थानकात आरोपींविरोधात तक्रार दाखल केल्यानंतर या प्रकरणी भारतीय न्याय संहितेतील कलम ६४(१) बलात्कार, कलम ७० (१) सामूहिक बलत्कार यानुसार गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपींना तात्काळ अटक करण्यात आल्याचंदेखील पोलिसांनी सांगितलं.

चौकशीतून समोर आलेल्या माहितीनुसार, सदर बसच्या काचांवर काळ्या रंगाचे पेपर्स चिकटवण्यात आले होते. तसेच, या बसमधून आणीबाणीच्या प्रसंगी बाहेर पडण्यासाठी पर्यायी मार्गदेखील नव्हते, अशीही माहिती समोर आली आहे.

नेमकं काय घडलं?

दाखल करण्यात आलेल्या तक्रारीनुसार, पीडित महिला १२ मे रोजी कामावरून घरी परतत असताना हा गुन्हा घडला. दिल्लीतील सरस्वती विहार परिसरातील बी-ब्लॉग बसस्टँडजवळ ती पोहोचली असता एका आरोपीला महिलेनं वेळ काय झाली असं विचारलं. हा आरोपी यावेळी गुन्हा घडला त्याच बसशेजारी उभा होता. परिस्थितीचा गैरफायदा घेत आरोपीनं पीडित महिलेला जबरदस्तीने बसमध्ये खेचलं. बसमध्येच दोन्ही आरोपींनी महिलेवर बलात्कार केला. यानंतर आरोपींनी महिलेला बसमधून बाहेर ढकलून दिलं आणि घटनास्थळावरून ते निघून गेले.

पीडित महिलेची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर तिचा जबाब नोंदवण्यात आला. गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया पार पडल्यानंतर आरोपींचा शोध घेऊन त्यांना अटक करण्यात आली. सध्या दोन्ही आरोपी पोलीसांच्या ताब्यात असून त्यांची चौकशी केली जात आहे. सदर बस बंद अवस्थेत होती की प्रवासी वाहतुकीसाठी वापरली जात होती? गुन्हा घडला तेव्हा बसमध्ये इतरही कुणी प्रवासी होते का? अशा बाबींचा तपास पोलिसांकडून केला जात आहे.