दिल्लीतील विकास मार्गावर रविवारी रात्री झालेल्या भीषण अपघातात आम आदमी पक्षाचे आमदार अनिल झा आणि कर्नाटकातील भाजपा आमदार अभय पाटील यांच्यासह किमान सहा जण जखमी झाले. लक्ष्मी नगरहून आयटीओच्या दिशेने जाणाऱ्या एका हॅचबॅक कारने रस्त्याच्या दुभाजकाला धडक दिल्यानंतर रेलिंग ओलांडून विरुद्ध मार्गावर प्रवेश केला आणि समोरून येणाऱ्या एसयूवीला धडक दिली. हा अपघात मध्य दिल्लीतील आयटीओजवळ सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालय मुख्यालयाच्या परिसरात रात्री सुमारे साडेनऊ वाजता झाला. पोलिसांना अपघाताची माहिती मिळताच आयपी इस्टेट पोलिस ठाण्याचे पथक घटनास्थळी पोहोचले. याबद्दल सविस्तर वृत्त हिंदुस्थान टाइम्सने दिली आहे.

हॅचबॅक कार दुभाजक ओलांडून विरुद्ध मार्गावर

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीतील आर्यनगर येथील ३२ वर्षीय रहिवासी आशुतोष हापांडे हॅचबॅक कार चालवत होता. त्याच्याबरोबर पत्नी आणि दोन अल्पवयीन मुले होती. लक्ष्मी नगरहून आयटीओच्या दिशेने जात असताना सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयाजवळ कारने प्रथम रस्त्याच्या दुभाजकाला धडक दिली. त्यानंतर कारने रेलिंग ओलांडले आणि विरुद्ध दिशेच्या मार्गावर गेली. त्याचवेळी आयटीओहून लक्ष्मी नगरच्या दिशेने जाणाऱ्या एसयूवीला कारने धडक दिली. या धडकेत दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले असून एसयूवीच्या पुढील भागाचे विशेष नुकसान झाले.

दोन आमदार एसयूवीमध्ये

अपघाताच्या वेळी एसयूवीमध्ये दिल्लीतील किरारी विधानसभाचे आपचे आमदार अनिल झा आणि कर्नाटकातील भाजपा आमदार अभय पाटील प्रवास करत होते. पोलिसांच्या माहितीनुसार, अपघातात सहभागी सर्व सहा जणांना किरकोळ दुखापत झाली. त्यांना उपचारासाठी लोकनायक रुग्णालयात दाखल करण्यात आले. सर्वांची प्रकृती स्थिर असल्याचे पोलिसांनी सांगितले.

अग्निशमन दलाची मदत

अपघातानंतर दोन्ही वाहनांचे नुकसान झाल्यामुळे रस्त्यावर वाहतुकीचा अडथळा निर्माण झाला. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आणि खराब झालेली वाहने हटवण्यासाठी अग्निशमन दलाला घटनास्थळी बोलावण्यात आले. पोलिसांनी अपघाताच्या नेमक्या कारणाचा तपास सुरू केला असून प्राथमिक चौकशीत हॅचबॅक कारने दुभाजकाला धडक दिल्यानंतर विरुद्ध मार्गावर गेल्याचे समोर आले आहे.