Delhi Chief Minister Arvind Kejriwal Bail : दिल्ली मद्य धोरण गैरव्यवहार प्रकरणात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सर्वोच्च न्यायालयाने अखेर जामीन मंजूर केला आहे. आज (१३ सप्टेंबर) सर्वोच्च न्यायालयाने यासंदर्भातील निर्णय दिला आहे. गेल्या काही महिन्यांपासून अरविंद केजरीवाल तुरुंगात आहेत. मात्र, सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे अरविंद केजरीवाल यांचा तुरुंगातून बाहेर येण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. आज संध्याकाळपर्यंत तिहार जेलमधून त्यांची सुटका होण्याची शक्यता आहे.

अरविंद केजरीवाल यांच्या जामीन याचिकेसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने आज सुनावणीसाठी सूचिबद्ध केली होती. काही दिवसांपूर्वी केजरीवाल यांच्यावर मद्य धोरण घोटाळा प्रकरणाशी संबंधित आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपवरून सीबीआयने त्यांना अटक केली होती. यानंतर केजरीवाल यांनी या अटकेला आव्हान देणारी आणि जामीन मिळण्यासंदर्भातील अशा दोन स्वतंत्र याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केल्या होत्या. या याचिकेवरील सुनावणी सर्वोच्च न्यायालयात पार पडली होती. सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने ५ सप्टेंबरला झालेल्या सुनावणीदरम्यान याचिकेवरील निकाल राखीव ठेवला होता. यानंतर आज सर्वोच्च न्यायालयाने निकाल देत मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना जामीन मंजूर केला आहे.

हेही वाचा : Mamata Banerjee: पश्चिम बंगालच्या राज्यपालांनी ममता बॅनर्जींवर टाकला बहिष्कार; म्हणाले, “इथून पुढे मी त्यांच्याबरोबर…”!

अरविंद केजरीवाल यांना २१ मे रोजी ईडीकडून अटक करण्यात आली होती. ईडीकडून अटकेच्या कारवाईआधी अरविंद केजरीवाल यांना तब्बल नऊ वेळा समन्स बजावण्यात आले होते. त्यानंतर अरविंद केजरीवाल यांना ईडीकडून अटक झाली होती. काही दिवसांपूर्वी ईडीच्या अटकेत अरविंद केजरीवाल यांना न्यायालयाने जामीन मंजूर केला होता. मात्र, त्याच दरम्यान अरविंद केजरीवाल यांना सीबीआयने २६ जूनला अटक केली होती. त्यामुळे केजरीवाल यांच्या अडचणीत वाढ झाली होती. त्यानंतर सीबीआयच्या अटकेच्या विरोधात अरविंद केजरीवाल यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. तसेच सीबीआयने अटक केलेल्या प्रकरणातही जामीन मिळण्याची याचिका दाखल केली होती. अखेर आज अरविंद केजरीवाल यांना सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.

अरविंद केजरीवालांना जामीन मिळताच शरद पवाराचं ट्विट

दिल्ली मद्य धोरण गैरव्यवहार प्रकरणात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सर्वोच्च न्यायालयाने आज जामीन मंजूर केला. अरविंद केजरीवाल यांना जामीन मिळताच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर पोस्ट केली आहे. शरद पवार यांनी म्हटलं आहे की, “दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना मिळालेल्या जामीनातून एक गोष्ट स्पष्ट झाली की देशात लोकशाहीचा पाया आजही भक्कम आहे. इतक्या दिवसांचा लढा आज सत्याच्या मार्गाने निघाला. अधम मार्गाने एखाद्याला नामोहरम करण्याचा कट लोकशाही बुलंद असणाऱ्या देशात कधीच यशस्वी होणार नाही, अशी भावना केजरीवाल यांना मिळालेल्या जामीनातून पक्की झाली.”