SIR Notice to CM Rekha Gupta and Arvind Kejriwal: राजधानी दिल्लीमध्ये सध्या सुरू असलेल्या ‘विशेष सखोल पुनरीक्षण’ (SIR) मोहिमेअंतर्गत मतदार यादीतील पात्रतेची पडताळणी करण्यासाठी सुमारे ३३ लाख मतदारांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. यामध्ये दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता, माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि दिल्ली भाजपाचे माजी प्रदेशाध्यक्ष वीरेंद्र कुमार सचदेवा यांच्यासारख्या प्रमुख राजकीय नेत्यांचा समावेश असल्याचे शनिवारी जाहीर करण्यात आलेल्या यादीतून समोर आले.
उत्तर-पश्चिम दिल्लीतील शालीमार बाग मतदारसंघातील मतदार असलेल्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांना त्यांच्या जनगणना अर्जातील वयाच्या नोंदीवरून नोटीस बजावण्यात आली होती. रेखा गुप्ता आणि त्यांच्या पालकांच्या वयामध्ये १५ वर्षांपेक्षा कमी अंतर दिसत असल्यामुळे ही नोटीस बजावण्यात आली. मात्र, आवश्यक कागदपत्रे सादर केल्यानंतर त्यांच्या तपशीलाची पडताळणी पूर्ण झाली असल्याचे निवडणूक अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
“संबंधित मतदाराने सादर केलेल्या कागदपत्रांची आणि वस्तुस्थितीची तपासणी केल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची नोंदणी वैध ठरवण्यात आली असून, शालीमार बाग मतदारसंघाच्या अंतिम मतदार यादीत त्यांचा समावेश केला जाईल,” असे शालीमार बाग मतदारसंघाच्या निवडणूक नोंदणी अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

केजरीवाल यांच्यावरील कारवाईवरून ‘आप’चा हल्लाबोल
आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक आणि माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, त्यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल, त्यांचे आई-वडील आणि मुलगा यांनी मागील एसआयआर मोहिमेचा आवश्यक तपशील सादर न केल्याचे आयोगाने म्हटले आहे. “अरविंद केजरीवाल आणि त्यांच्या कुटुंबीयांनी सादर केलेल्या अर्जांमध्ये शेवटच्या सुधारित मतदार यादीशी त्यांची जोडणी साधण्यासाठी आवश्यक असणारा तपशील अपूर्ण होता,” असे नवी दिल्ली मतदारसंघाच्या निवडणूक नोंदणी अधिकाऱ्यांनी निवेदनात नमूद केले आहे.
दरम्यान, या कारवाईवरून ‘आप’ने भाजपावर जोरदार निशाणा साधला आहे. पक्षाचे राष्ट्रीय माध्यम प्रभारी अनुराग ढांडा यांनी ‘एक्स’वर टीका करताना म्हटले, “आम्ही पहिल्या दिवसापासून सांगत आहोत की, ही पुनरिक्षण मोहीम नसून भाजपाचा डाव आहे. भाजपाच्या हातात असते तर त्यांनी केवळ पंतप्रधान मोदी आणि अमित शाहा यांच्यापुरताच मतदानाचा अधिकार मर्यादित ठेवला असता आणि विरोधकांची मते वगळली असती. दिल्लीचे तीन वेळा मुख्यमंत्री राहिलेले अरविंद केजरीवाल आणि त्यांच्या कुटुंबीयांची मते मतदार यादीतून गायब करण्याची ही कोणती पद्धत आहे?”
दुसरीकडे, पूर्व दिल्लीतील त्रिलोकपुरी मतदारसंघात भाजपा नेते वीरेंद्र कुमार सचदेवा यांच्या नावात तफावत आढळल्याने त्यांनाही नोटीस बजावण्यात आली आहे. यावर, “मला नोटीस बजावण्यात आल्याची माहिती नुकतीच मिळाली असून मी कागदपत्रांची पडताळणी करेन,” अशी प्रतिक्रिया सचदेवा यांनी दिली.
नोटीस नेमकी का आणि पुढील प्रक्रिया काय?
दिल्लीत विशेष सखोल पुनरीक्षण मोहीम सुरू होण्यापूर्वी मतदारांची संख्या १ कोटी ४५ लाख इतकी होती. ३१ ऑगस्ट रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रारूप मतदार यादीत ९७.५ लाख मतदारांची नावे समाविष्ट करण्यात आली आहेत. घरोघरी जाऊन केलेल्या तपासणीत अनुपस्थित आढळणे, स्थलांतर, मृत्यू अथवा दुबार नोंदी या कारणांमुळे सुमारे ४७.५ लाख नावे वगळण्यात आली आहेत. या नागरिकांना नव्याने नोंदणी करण्याचा किंवा अपील करण्याचा अधिकार उपलब्ध आहे.
नोटीस बजावण्यात आलेल्या ३३.१ लाख मतदारांपैकी १३.७९ लाख मतदारांना मागील विशेष सखोल पुनरीक्षण तपशीलाशी ताळमेळ साधता आलेला नाही; तर १९.३३ लाख मतदारांच्या अर्जांमध्ये विसंगती आढळली आहे. दिल्ली मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या माहितीनुसार, ३१.६ लाख नोटिसा तयार करण्यात आल्या असून त्यांचे वितरण सुरू आहे.
या नोटिसांवर ३१ ऑगस्ट ते २९ ऑक्टोबरदरम्यान सुनावणी व निकाल दिला जाईल, तर अंतिम मतदार यादी ४ नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध होणार आहे.
न्यायव्यवस्था, लोकप्रतिनिधी, उच्चपदस्थ अधिकारी तसेच कला, क्रीडा, पत्रकारिता आणि समाजकार्य या क्षेत्रांतील मान्यवरांना दावे व हरकतींच्या काळात कागदपत्रे सादर करता यावीत, यासाठी त्यांचा समावेश प्रारूप यादीत करण्यात आला असल्याचे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे.
