विविध शैक्षणिक आणि भरती परीक्षांमधील गैरव्यवहार आणि पेपर फुटी मुद्द्यावरून देशातील तरुण वर्ग आक्रमक झाला आहे. ‘कॉक्रोच जनता पार्टी’चे (CJP) संस्थापक अभिजित दिपके आज सकाळी भारतात परतले असून, त्यांनी दिल्लीतील जंतर-मंतर येथे या भव्य आंदोलनाचे नेतृत्व केले. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत हजारो विद्यार्थी आणि तरूणांनी या आंदोलनात सहभाग घेतला. या आंदोलनादरम्यान जंतर-मंतर परिसरात कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली होती.

आंदोलनाला संबोधित करताना अभिजित दिपके म्हणाले, “आपला हा लढा मोठा आहे. आम्ही गेल्या एका महिन्यापासून सोशल मीडियावर शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहोत. मात्र, कारवाई करण्याऐवजी आमचे सोशल मीडिया अकाउंट्स हॅक करणे आणि पोस्ट डिलीट करण्याचे काम केले जात आहे. तुम्ही आमच्या पोस्ट डिलीट करू शकता, पण आम्हाला इथून हटवू शकत नाही.” या आंदोलनादरम्यान दिपके यांच्या हातात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे आत्मचरित्र पाहायला मिळाले. याबाबतचे वृत्त ‘हिंदुस्तान टाइम्स’ या वृत्तसंस्थेने प्रसिद्ध केले आहे.

आंदोलनकर्त्यांच्या ५ प्रमुख मागण्या –

१. केंद्रीय शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा – नीट पेपर लीक प्रकरण आणि सीबीएसईच्या ‘ऑन-स्क्रीन मार्किंग सिस्टम’मधील कथित अनियमिततेची जबाबदारी स्वीकारून शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी तातडीने राजीनामा द्यावा.

२. योग्य प्रशिक्षणाशिवाय घाईघाईने डिजिटल शिक्षण नको – शिक्षण क्षेत्रात तंत्रज्ञानाचा वापर करण्यापूर्वी शिक्षकांना त्याचे योग्य प्रशिक्षण आणि मूल्यमापन दिले जावे. डिजिटल प्रणालीमुळे होणारे गैरप्रकार आधी रोखले जावेत.

३. मणिपूरमधील शिक्षण व्यवस्था पूर्ववत करा – गेल्या तीन वर्षांपासून मणिपूरमध्ये सुरू असलेल्या अनौस्थेमुळे तेथील शाळा आणि महाविद्यालये विस्कळीत झाली आहेत. तेथील विद्यार्थ्यांचा मानसिक ताण कमी करून शिक्षण व्यवस्था तातडीने सुरळीत करावी.

४. स्पर्धा परीक्षांमध्ये पारदर्शकता आणि विश्वासार्हता – लाखो विद्यार्थी वर्षानुवर्षे एका छोट्या खोलीत राहून परीक्षांची तयारी करतात. मात्र, पेपर फुटीमुळे त्यांच्या कष्टावर पाणी फेरले जाते. त्यामुळे परीक्षांमध्ये पारदर्शकता आणून त्यांची विश्वासार्हता टिकवून ठेवावी.

५. विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याची जबाबदारी आणि उत्तरदायित्व – परीक्षांमधील गोंधळामुळे लाखो विद्यार्थी प्रचंड मानसिक दबावाखाली आहेत, तर काहींनी टोकाचे पाऊल उचलले आहे. या सर्व परिस्थितीला प्रशासनाने जबाबदार धरून विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याकडे लक्ष दिले पाहिजे.

अनोखे आंदोलन आणि घोषणाबाजी

या आंदोलनात शाळा-महाविद्यालयांचे विद्यार्थी, पालक आणि तरुण व्यावसायिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. अनेक आंदोलकांनी चेहऱ्यावर कॉक्रोचचे (झुरळाचे) मास्क लावले होते आणि हातात फुले घेतली होती.

आंदोलनस्थळी तरुणांनी “धर्मेंद्र प्रधान, राजीनामा द्या!” अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला. तसेच आंदोलनात “जय भीम”च्या घोषणाही देण्यात आल्या. सोशल मीडियावरून सुरू झालेली ही चळवळ आता थेट रस्त्यावर उतरल्याने केंद्र सरकारवरील दबाव वाढण्याची शक्यता आहे.