Delhi Company Diwali Gift iPhone 16 : दिवाळी म्हटलं की, अनेक कंपन्यांकडून कर्मचाऱ्यांना मिठाईचे बॉक्स, गिफ्ट हॅम्पर्स किंवा उपयोगी वस्तू भेट म्हणून दिल्या जातात. मात्र, दिल्लीतील एका कंपनीने कर्मचाऱ्यांना चक्क आयफोन १६ भेट देऊन सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. या कंपनीने दिवाळीनिमित्त कर्मचाऱ्यांना दिलेल्या भेटवस्तूंचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला असून, तो सध्या व्हायरल होत आहे. याबद्दलचे वृत्त एनडीटीव्हीने दिले आहे.
दिल्लीतील रोहिणी परिसरात असलेल्या या कंपनीने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. अवघ्या १५ सेकंदांच्या या व्हिडीओमध्ये कर्मचाऱ्यांच्या डेस्कवर आयफोन १६ ठेवलेले दिसत आहेत. प्रत्येक फोनला सजावटीसाठी रिबन बांधण्यात आली आहे. पांढऱ्या, हिरव्या, निळ्या व काळ्या अशा वेगवेगळ्या रंगांचे आयफोन या व्हिडीओमध्ये पाहायला मिळतात.
आयफोन पाहून कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद
व्हिडीओच्या शेवटच्या भागात काही महिला कर्मचारी मिळालेली भेटवस्तू पाहून आनंद व्यक्त करताना दिसतात. कंपनीने हा व्हिडीओ शेअर करताना ‘नो कॉम्पीटिशन. तुम्हाला काय मिळालं?’ अशा आशयाचे कॅप्शन दिली आहे. दिवाळीच्या भेटवस्तूंच्या बाबतीत कंपनीने दिलेल्या या अनोख्या सरप्राईजची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
“आम्हाला तर साधा सोनपापडीचा डबाही मिळाला नाही”
व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी कंपनीच्या या निर्णयाचे कौतुक केले आहे. काही युजर्सनी सुरुवातीला हा व्हिडीओ खरा आहे की एआयच्या मदतीने तयार केला गेला आहे, असा प्रश्न उपस्थित केला. त्यावर कंपनीनेही मजेशीर प्रतिक्रिया देत व्हिडीओ पुन्हा पाहण्यास सांगितले आणि तो एआयने तयार केलेला नसल्याचे स्पष्ट केले.
एका युजरने या कंपनीत नोकरीची संधी आहे का, अशी विचारणा केली. तर दुसऱ्या युजरने दिवाळीत अशा भेटवस्तूंचे व्हिडीओ पाहून मत्सर वाटू नये म्हणून इन्स्टाग्राम वापरणंच बंद करावं लागेल, अशी गमतीशीर प्रतिक्रिया दिली.
एका युजरने महिला कर्मचाऱ्यांना आयफोन, तर पुरुष कर्मचाऱ्यांना सोन्याची नाणी दिली असावीत, असा विनोद केला. तर आणखी एका युजरने आपल्या कंपनीकडून साधा सोनपापडीचा डबाही मिळाला नसल्याची खंत विनोदी शैलीत व्यक्त केली. कंपनीच्या या दिवाळी गिफ्टमुळे सोशल मीडियावर मात्र भेटवस्तूंबाबत मोठ्या प्रमाणात चर्चा रंगली आहे.
