नवी दिल्ली : ‘कॉक्रोच जनता पार्टी’चे संस्थापक अभिजीत दिपके, ‘एआयएसए’च्या राष्ट्रीय अध्यक्ष नेहा बोरा यांच्यासह दीडशेहून अधिक पदाधिकार्यांची धरपकड झाल्यानंतरही शुक्रवारी दिल्लीच्या ‘कनॉट प्लेसवर तिरंगी लाट अवतरली. दिल्ली पोलिसांनी घातलेली बंदी, सेंट्रल पार्कमध्ये जाण्यास मज्जाव आणि ठिकठिकाणी असलेले बॅरिकेड झुगारून तरुण-तरुणींनी राष्ट्रध्वज फडकवत निवडणूक आयोगाविरोधात घोषणाबाजी केली. भाजपने हे आंदोलन म्हणजे ‘राजवट बदला’चा डाव असल्याचा आरोप केला तर पोलीस हा ‘सत्याग्रह’ मोडू शकणार नाहीत, असे काँग्रेस नेते राहुल गांधी म्हणाले.
‘कनॉट प्लेस’च्या सेंट्रल पार्कमध्ये शुक्रवारी संध्याकाळी पाच वाजता तिरंगा फडवण्यासाठी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन दिपके यांनी केले होते. मात्र, दिल्ली पोलिसांनी शुक्रवारी दुपारीच दिपके राहत असलेल्या ठिकाणी जाऊन त्यांना नोटीस बजावली. नागरिक, व्यापारी आणि प्रवासी यांच्या अधिकारांवर गदा आणणारे कृत्य करू नका, असा इशारा त्यांना या नोटिशीतून देण्यात आला होता. मात्र, त्यानंतरही दिपके यांनी घराबाहेर पडण्याचा प्रयत्न केला असता त्यांना ताब्यात घेण्यात आले.
नेहा बोरा यादेखील ‘एआयएसए’च्या आंदोलनासाठी मंडी हाऊसकडे निघाल्या असताना त्यांना ताब्यात घेण्यात आले. या दोन्ही नेत्यांना अज्ञात स्थळी नेण्यात आले असून त्यांना कायदेविषयक मदत करू दिली जात नसल्याचा आरोप ‘सीजेपी’ने रात्री उशिरा केला. त्याबाबत दिल्ली पोलिसांकडूनही अधिकृत माहिती देण्यात आली नव्हती.
तत्पूर्वी, शुक्रवारी सायंकाळी पोलिसांनी सेंट्रल पार्कवर कडेकोट बंदोबस्त आणि अडथळे उभारले असतानाही तरुण-तरुणींचे जत्थेच्या जत्थे कनॉट प्लेस येथे जमले. छोट्या-छोट्या गटांमध्ये विभागून तरुण हातात तिरंगा घेत, ‘आझादी, आझादी’, ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम’, ‘ज्ञानेश कुमार इस्तिफा दो’ अशा घोषणा देत होते. जसजशी गर्दी वाढू लागली, तसतशी पार्कच्या प्रवेशद्वारासमोरील आणि आतील पोलिसांची तैनातही वाढवण्यात आली.
आंदोलकांना पोलिसांनी वेढले होते, तरीही घोषणाबाजी करणारे तरुण शांततेत आंदोलन करत होते. संध्याकाळी साडेसहानंतर एआयएसए, एसएफआय आदी डाव्या विद्यार्थी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक घोषणाबाजी केली. सुमारे सातनंतर पोलिसांनी आंदोलकांना हटवण्यास सुरुवात केली मात्र, बळाचा वापर केला नाही.
परस्परविरोधी घोषणा
ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात रस्त्यावर उतरलेल्या तरुण आंदोलकांची ‘व्होट चोर, गद्दी छोड’ आणि ‘मुर्दाबाद’ अशा घोषणाबाजी सुरू असताना अचानक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करणारा गटही परिसरात आला. त्यांनी ‘मोदी, मोदी’ अशा घोषणा सुरू केल्या. त्याला आंदोलकांनी ‘जय भीम’च्या घोषणांनी प्रत्युत्तर दिले. पोलिसांनी या परिसरातून आंदोलकांना दूर करेपर्यंत परस्परविरोधी घोषणाबाजी सुरू होती.
‘निवडणुकीतून सत्ताबदलाचाच उद्देश’
‘लोकशाहीमध्ये विरोधक रस्त्यावर उतरून आंदोलन करत असतील तर त्यांचा उद्देश सत्ताबदल हाच असणार. मात्र हा सत्ताबदल निवडणुकीच्या माध्यमातूनच होतो,’ असे स्पष्ट करत काँग्रेसचे पवन खेरा यांनी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिले.
