Delhi couple arrested for spying for Pakistan : दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने पाकिस्तानस्थित गुप्तचर यंत्रणेसाठी हेरगिरी करणाऱ्या कथित यंत्रणेचे जाळे उघडकीस आणल्याचा दावा केला आहे. या प्रकरणी दिल्लीतील दाम्पत्याला अटक करण्यात आली आहे. मोहम्मद साहिल (२५) आणि त्याची पत्नी समीरा (२१) हे दोघेही २०२४ पासून पाकिस्तानी हँडलर्सच्या संपर्कात असल्याचे तपासात समोर आल्याचे पोलिसांनी सांगितले. याबद्दल सविस्तर वृत्त हिंदुस्थान टाइम्सने दिले आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, या दाम्पत्याने भारतीय सिमकार्ड खरेदी करून दुबईमार्गे पाकिस्तानात पाठवले. या सिमकार्डचा वापर पाकिस्तानातून व्हॉट्सॲप सुरू करण्यासाठी आणि भारतातील काही व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये सहभागी होऊन भारतीय संरक्षण व्यवस्थेशी संबंधित संवेदनशील आणि गोपनीय माहिती मिळवण्यासाठी करण्यात आल्याचा आरोप आहे.
भारतीय सिमकार्ड पाकिस्तानात पाठवल्याचा आरोप
दिल्ली पोलिसांचे विशेष पथक दहशतवादी संघटना, त्यांचे स्लीपर सेल्सवर लक्ष ठेवते. याच पथकाला दिल्ली आणि राष्ट्रीय राजधानी क्षेत्रात पाकिस्तानच्या आयएसआयशी संबंधित हेरगिरीचे नेटवर्क सुरु असल्याची माहिती मिळाली होती. तपासादरम्यान या नेटवर्कने दिल्लीमध्ये काही लोकांना लॉजिस्टिक मदतीसाठी सहभागी करून घेतल्याचे आणि त्यांच्यामार्फत भारतीय सिमकार्ड मिळवल्याचे समोर आले. या क्रमांकांवरून पाकिस्तानमध्ये व्हॉट्सॲप वापरले जात असल्याचेही तपासात आढळले.
दक्षिण दिल्लीतील सराय काले खान येथे राहणाऱ्या साहिलला पोलिसांनी अटक केली. त्याच्या मोबाइल फोनच्या शास्त्रीय तपासणीत पाकिस्तानी एजंट्ससोबतचे संदेश सापडल्याचे पोलिसांनी सांगितले.
इंस्टाग्रामवरून संपर्क, नंतर हेरगिरीच्या जाळ्यात ओढल्याचा दावा
पोलिसांच्या माहितीनुसार, साहिलची एका पाकिस्तानी एजंटशी इंस्टाग्रामच्या माध्यमातून ओळख झाली होती. साहिलची पत्नी समीरा हिच्यामार्फत ही ओळख झाल्याचे तपासात समोर आले. त्यानंतर या एजंटने दोघांची एका पाकिस्तानी गुप्तचर अधिकाऱ्याशी ओळख करून दिल्याचा आरोप आहे. आर्थिक फायद्याचे आमिष दाखवून दोघांना त्यांच्यासाठी काम करण्यास तयार करण्यात आले, असे पोलिसांनी सांगितले.
८ सिमकार्डसाठी ३० हजार रुपये
पोलिसांच्या म्हणण्यानुसार, २०२४ आणि २०२५ मध्ये आठ भारतीय सिमकार्ड दुबईमार्गे पाकिस्तानात पाठवण्यासाठी या दाम्पत्याला सुमारे ३० हजार रुपये देण्यात आले. या सिमकार्डवर पाकिस्तानातून व्हॉट्सॲप अकाउंट सुरु करण्यात आले. त्यानंतर या अकाउंटच्या माध्यमातून भारतातील काही व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये प्रवेश मिळवून संवेदनशील माहिती गोळा करण्याचा प्रयत्न करण्यात आला. तसेच भारतीय नागरिकांशी संपर्क साधून माहिती मिळवण्याचा प्रयत्न केल्याचेही तपासात समोर आल्याचे पोलिसांनी सांगितले.
मोबाइल तपासणीत महत्त्वाचे पुरावे
पोलिसांनी सांगितले की, दाम्पत्याच्या चौकशीत पाकिस्तानमधील सूत्रधार आणि भारतातील स्लीपर सेल्स यांच्यातील संपर्काची पद्धत समोर आली आहे. संदेश सुरक्षित राहतील अशा तंत्रज्ञानाचा वापर करून या नेटवर्कचे कामकाज चालत असल्याचेही तपासात उघड झाले, असा पोलिसांचा दावा आहे.
साहिलने इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठातून शिक्षण घेतले असून तो एका वकिलाकडे काम करत होता. पुढे कायद्याचे शिक्षण घेण्याची त्याची योजना होती. जून २०२२ मध्ये त्याने नोकरी सोडली आणि त्यानंतर तो बेरोजगार होता. समीरा हिने पत्रव्यवहारातून बीएचे शिक्षण पूर्ण केले असून ती कॉल सेंटरमध्ये काम करत होती.
पोलिसांकडून या हेरगिरी नेटवर्कशी संबंधित इतर व्यक्तींचा शोध आणि दाम्पत्याच्या संपर्कातील पाकिस्तानी हँडलर्सची माहिती मिळवण्यासाठी तपास सुरू आहे.
