Dhruv Rathee Delhi Court Defamation Case: प्रसिद्ध यूट्यूबर आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर ध्रुव राठीच्या अडचणींत वाढ झाली आहे. आठ वर्षे जुन्या एका फौजदारी अब्रूनुकसानीच्या प्रकरणात दिल्लीतील एका न्यायालयाने शनिवारी ध्रुव राठीविरुद्ध नव्याने जामीनपात्र वॉरंट जारी केले. यापूर्वी जारी करण्यात आलेले वॉरंट राठीच्या गुरुग्राम येथील पत्त्याऐवजी ऑस्ट्रियातील चुकीच्या पत्त्यावर पाठवण्यात आल्याचे समोर आल्यानंतर न्यायालयाने हा आदेश दिला.

साकेत न्यायालयाचे प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी राहुल जैन यांनी जुन्या वॉरंटची अंमलबजावणी होऊ न शकल्याने हे नवे वॉरंट काढले आहे. सुनावणीदरम्यान तक्रारदाराच्या वकिलांनी न्यायालयात सांगितले की, ध्रुव राठी आधीच भारतातून बाहेर पडला असून सध्या तो विदेशात वास्तव्यास आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी आता २३ नोव्हेंबर रोजी होणार आहे.

नेमके प्रकरण काय?

मे २०१८ मध्ये ध्रुव राठीने त्याच्या यूट्यूब चॅनलवर ‘BJP IT Cell Part II’ या शीर्षकाचा एक व्हिडिओ प्रसिद्ध केला होता. या व्हिडिओवरून विकास सांकृत्यायन यांनी राठीविरुद्ध फौजदारी अब्रूनुकसानीची तक्रार दाखल केली होती.

या व्हिडिओमध्ये भाजपाच्या आयटी सेलच्या सदस्यांनी सांकृत्यायन यांची बदनामी करण्यासाठी लाच देण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप राठीने केला होता. हे सर्व आरोप पूर्णपणे खोटे, तथ्यहीन आणि जाणीवपूर्वक आपली प्रतिमा मलीन करण्याच्या हेतूने करण्यात आल्याचा दावा करत सांकृत्यायन यांनी न्यायालयात धाव घेतली.

दिल्लीचे तत्कालीन मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी २०१८ मध्ये हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर हे प्रकरण चांगलेच चर्चेत आले होते.

केजरीवाल यांनी मान्य केली होती चूक

सांकृत्यायन यांनी सुरुवातीला ध्रुव राठी आणि अरविंद केजरीवाल या दोघांविरुद्धही अब्रूनुकसानीचा खटला दाखल केला होता. मात्र त्यानंतर केजरीवाल यांनी हा व्हिडिओ शेअर करणे ही आपली चूक होती, अशी कबुली न्यायालयात दिली. त्यामुळे त्यांच्याविरुद्धची कायदेशीर प्रक्रिया वेगळी झाली. तरीही व्हिडिओचा मुख्य निर्माता आणि प्रकाशक म्हणून ध्रुव राठीविरुद्ध साकेत न्यायालयात मूळ खटला सुरूच राहिला.

ध्रुव राठी हा प्रामुख्याने परदेशात राहत असल्याने त्याला समन्स बजावण्यात अनेक अडचणी येत आहेत. न्यायालयाने २३ जुलै २०१९ रोजीच त्याला पहिली नोटीस पाठवली होती; मात्र त्याची न्यायालयात उपस्थिती निश्चित होऊ न शकल्याने हे प्रकरण प्रदीर्घ काळ प्रलंबित राहिले.

यापूर्वी १२ ऑक्टोबर रोजी झालेल्या सुनावणीत, प्रकरणाचा निपटारा जलद गतीने व्हावा यासाठी सांकृत्यायन यांनी केलेल्या तातडीच्या अर्जावर न्यायालयाने नव्याने समन्स जारी केले होते. त्यावेळी तक्रारदाराचे वकील समक्ष शर्मा यांनी न्यायालयाला सांगितले होते की, सामान्यत: जर्मनीमध्ये राहणारा राठी एका आंदोलनात सहभागी होण्यासाठी भारतात आला होता. त्यावेळी तो हरयाणातील गुरुग्राम येथील सेक्टर ५६ मध्ये थांबला असल्याची माहिती देत त्याचा पत्ता न्यायालयाला देण्यात आला होता आणि त्यानुसार समन्स बजावण्याची विनंती करण्यात आली.