दिल्लीत ४६ वर्षीय दीपक डबास यांना १४ दिवसांच्या अंतराने दोनदा वाहनाने धडक दिल्याची घटना समोर आली आहे. सुरुवातीला हे दोन्ही अपघात असल्याचे वाटत होते. मात्र पोलिसांच्या तपासात ही घटना तब्बल २७ वर्षांपासून सुरू असलेल्या शत्रुत्वातून घडवून आणलेला नियोजित हल्ला असल्याचे समोर आले. याबद्दल सविस्तर वृत्त द इंडियन एक्सप्रेसने दिले आहे.
पहिल्या अपघातातून बचाव, दुसऱ्यांदा जीव गेला
२ जुलै रोजी मजरा डबास येथील रहिवासी दीपक हे स्कूटरवरून जात असताना बाह्य दिल्लीतील एका रस्त्यावर ह्युंदाई आय१० कारने त्यांच्या स्कूटरला धडक दिली. दीपक शेतात पडल्याने थोडक्यात बचावले, मात्र त्यांना दुखापत झाली. १६ जुलै रोजी चांदपूर मजरा रोडवर स्कॉर्पिओ वाहनाने दीपक यांना पुन्हा धडक दिली. या घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी पोहोचले. तेथे दीपक मृतावस्थेत आढळले, तर त्यांची स्कूटर सुमारे १०० मीटर अंतरावर पडलेली होती. पोलिसांच्या लक्षात आलेली सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे दीपक यांच्या छातीवर आणि पायांवर टायरच्या खुणा होत्या. त्यामुळे वाहनाने केवळ धडक दिली नसून त्यांना वारंवार चिरडण्यात आल्याचा संशय निर्माण झाला.
२७ वर्षांच्या जुन्या शत्रुत्वाचा बदला
तपासात या हत्येमागे पवन उर्फ जगपाल डबास याचा हात असल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांच्या माहितीनुसार, सुमारे २७ वर्षांपूर्वी दीपक यांनी पवनच्या बहिणीबरोबर गैरवर्तन केल्याचा आरोप होता. त्यानंतर पवनच्या काकांच्या मुलाने, राजपालने, दीपकला मारहाण केली होती. त्याला प्रत्युत्तर म्हणून दीपकने राजपालवर हल्ला केला आणि दोन्ही कुटुंबांमध्ये वैर निर्माण झाले. दीपक पवनच्या बहिणीला पुढील अनेक वर्षे त्रास देत असल्याचा आरोपही करण्यात आला. गेल्या वर्षी त्याने पवनचा जवळचा मित्र सागर काला याच्या बहिणीबरोबरही गैरवर्तन केले होते. तेव्हाच त्या दोघांनी बदला घेण्याचे ठरवले.
दुसऱ्या प्रयत्नात हत्या
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दीपकची हत्या करण्याचा कट फेब्रुवारीमध्ये सुरू झाला. त्याला घाबरवण्यासाठी त्याच्या घराबाहेर गोळीबार करण्यात आला होता. पहिल्या प्रयत्नानंतर पवनने दुसऱ्यावेळी स्वतः वाहन चालवण्याचा निर्णय घेतल्याचे पोलिसांनी सांगितले. १६ जुलै रोजी स्कॉर्पिओने दीपकला धडक दिली आणि त्याला वारंवार चिरडण्यात आले, असा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी कंझावला पोलिस आणि विशेष तपास पथक तयार करण्यात आले होते.
पाच जणांना अटक
तपासादरम्यान पोलिसांनी पवन उर्फ जगपाल डबास, सागर कला, अतुल उर्फ मॉन्टी, साहिल आणि प्रिन्स उर्फ टिल्ली या पाच जणांना अटक केली. १७ जुलै रोजी सागरला अटक करण्यात आली. चौकशीत त्याने २ जुलै रोजी दीपकला जाणूनबुजून कारने धडक दिल्याचे सांगितल्याचा पोलिसांचा दावा आहे. यानंतर अतुलकडून ह्युंदाई आय १० जप्त करण्यात आली. पवनला आश्रय दिल्याबद्दल आणि पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपावरून साहिलला २२ जुलै रोजी अटक करण्यात आली. २६ जुलै रोजी प्रिन्सला स्कॉर्पिओची व्यवस्था केल्याच्या आरोपावरून अटक करण्यात आली.
पोलिसांना चकवा देण्याचा प्रयत्न
हत्येनंतर पवनने पोलिसांना चकवा देण्याचा प्रयत्न केल्याचे तपासात समोर आले. तो आधी मेरठ, त्यानंतर हिसार, राजस्थान आणि गुजरात येथे गेला. कावड यात्रा सुरू झाल्यानंतर तो हरिद्वारला पोहोचला आणि कावडियांसाठी उभारलेल्या तंबूंमध्ये राहिला. अखेर १२ ऑगस्ट रोजी पवनला अटक करण्यात आली.
पोलिसांच्या माहितीनुसार, पवनविरोधात यापूर्वी चार गुन्हे दाखल आहेत, तर सागर कला आणि अतुल यांच्याविरोधात प्रत्येकी दोन गुन्हे दाखल आहेत.
