शिक्षकांनी सरळ बसायला सांगितल्याने विद्यार्थी संतापला; लोखंडी रॉडने केला हल्ला

या प्रकरणामध्ये हल्ला करणाऱ्या व्यक्तीला अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली असून शिक्षकावर उपचार सुरु आहेत.

Ambulance
या शिक्षकावर उफचार सुरु आहेत. (प्रातिनिधिक फोटो सौजन्य रॉयटर्स)

दिल्लीच्या पश्चिमेकडील बपरोला गावामध्ये शाळेतील एका विद्यार्थ्याने शिक्षकावर हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. या विद्यार्थ्याने लोखंडाच्या सळईने शिक्षकाचं डोकं फोडलं आहे. पश्चिम दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रनहोला पोलीस स्थानकाअंतर्गत हा प्रकार घडलाय. बपरोला गावामध्ये एका मुलाने आपल्या शिक्षकांवर हल्ला केलाय. या हल्ल्यामध्ये शिक्षक गंभीर जखमी झाला असून त्याला रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे केवळ वर्गात नीट बसण्यासंदर्भात शिक्षकांनी सल्ला दिल्यानंतर विद्यार्थ्याने हा हल्ला केला.

पोलिसांनी न्यूज १८ ला दिलेल्या माहितीनुसार या हल्ल्यामध्ये जखमी झालेल्या शिक्षकाचं नाव विक्रांत असं असून त्याला उपचारासाठी राठी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांनी रुग्णालयामध्ये विक्रांतची भेट घेऊन त्याचा जबाब नोंदवला आहे.

विक्रांत यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांनी शिक्षक म्हणून रुजू होण्यासाठी आवश्यक असणारी पदवी घेऊन बापरोला येथील सरकारी शाळेत नोकरी करण्यास सुरुवात केलीय. विक्रांत हे शाळेमध्ये नव्याने रुजू झालेल्या शिक्षकांपैकी आहेत. ते शिक्षकांच्या रुममध्ये बसलेले असतानाच शनिवारी सकाळी सव्वा आठच्या सुमारास ललित नावाच्या एका विद्यार्थ्याने त्यांच्यावर हल्ला केला. लोखंडी सळईने ललितने विक्रांत यांच्यावर हल्ला केला. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे विक्रांत गोंधळून गेले. त्यांना काही कळण्याच्या आतच त्यांच्या डोक्यावर मोठी खोच पडून त्यामधून रक्तसास्त्राव होऊ लागला. पोलिसांकडे विक्रांत यांनी नोंदवलेल्या जबाबामध्ये आपण या विद्यार्थ्याला वर्गात सरळ बसण्यासाठी ओरडा दिल्याचं म्हटलं आहे. त्याच रागातून हा हल्ला झाल्याची शक्यताही त्यांनी व्यक्त केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या ललित हा २१ वर्षांचा आहे. हा विद्यार्थी १२ व्या इयत्तेत दोन वेळा नापास झालाय. तो सध्या तिसऱ्यांदा बारावीचा अभ्यास करत असून शिक्षक ओरडल्याने त्याने हा हल्ला केल्याचं सांगितलं जात आहे. या प्रकरणामध्ये कलम ३०८ अंतर्गत पोलिसांनी गुन्हा दाखल करुन घेतलाय.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Delhi crime news teacher attacked with iron rod for asking student to sit properly scsg

ताज्या बातम्या