नागपूर : दिल्ली-डेहराडून द्रुतगती मार्ग प्रकल्पाअंतर्गत राजाजी राष्ट्रीय उद्यान परिसरात सुमारे १४ किलोमीटर लांबीची वन्यजीव मार्गिका तयार करण्यात आली आहे. आशियातील ही सर्वात लांब वन्यजीव मार्गिका ठरली आहे. डेहराडून येथील भारतीय वन्यजीव संस्था आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने ‘लँडस्केप्स रिकनेक्टेड’ या नुकत्याच केलेल्या संयुक्त अभ्यासात हत्तींसह सुमारे १८ विविध प्रजातीच्या वन्यप्राण्यांनी या मार्गिकेचा वापर केल्याची नोंद आहे.

विकास आणि वन्यजीव संवर्धन यांचा समतोल साधण्याच्या दृष्टीने दिल्ली-डेहराडून द्रुतगती मार्ग प्रकल्पाचे उद्घाटन १४ एप्रिलला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. सुमारे १२ हजार कोटी रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या या सहा पदरी मार्गामुळे दिल्ली ते डेहराडून प्रवासाचा कालावधी सहा तासांवरून अडीच तासांपर्यंत कमी होणार आहे.

तत्पूर्वीच या मार्गावर वन्यप्राण्यांसाठी तयार करण्यात आलेल्या मार्गिकांचा वापर मात्र वन्यप्राण्यांनी सुरू केला आहे. २१३ किलोमीटर लांबीच्या या द्रुतगती मार्गातील सुमारे १२ किलोमीटरचा उन्नत पट्टा वन्यजीवांसाठी तयार करण्यात आला आहे. हा भाग राजाजी व्याघ्रप्रकल्प आणि शिवालिक पर्वत रांगेतून जात असल्याने याठिकाणी वन्यप्राण्यांची हालचाल मोठ्या प्रमाणावर आहे. सात मीटर उंचीवर उभारलेल्या मार्गाखाली मोकळी जागा ठेवण्यात आली आहे. त्यामुळे वन्यजीवांना अडथळ्याविना मार्ग उपलब्ध झाला आहे. काही प्रजातींनी वाहतुकीच्या आवाजाशी जुळवून घेतले असले तरी हत्ती आणि चितळ यांसारख्या प्रजाती कमी आवाज असलेल्या भागांचा अधिक वापर करत असल्याचे या अभ्यासात दिसून आले. त्यामुळे भविष्यात ध्वनिरोधक भिंती उभारण्याची योजना आखण्यात आली आहे. वन्यप्राण्यांच्या सुरक्षित हालचालीसाठी ही रचना करण्यात आली असून, रोडकिल घटनांमध्ये घट होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

१५० कॅमेरे, २९ ध्वनीनोंदक

गणेशपूर ते अशारोडी या १८ किलोमीटरच्या पट्ट्यात १५० कॅमेरे आणि २९ ध्वनीनोंदक बसवण्यात आले. ४० दिवसांच्या निरीक्षणात सुमारे एक लाखाहून अधिक छायाचित्रे नोंदवण्यात आली. त्यातील ४० हजारातून अधिक छायाचित्रे वन्यजीवांची होती. यात सुवर्ण कोल्हा सर्वाधिक वेळा कॅमेऱ्यात दिसला. तर नीलगाय, सांबर आणि चितळ यांचीही मोठ्या प्रमाणात नोंद झाली. विशेष म्हणजे, या कालावधीत हत्तींच्या ६० सुरक्षित हालचाली भुयारी मार्गातून झाल्याचे आढळले.

भुयारी मार्ग, बोगदे आणि उंच रस्ते

१४ किलोमीटर लांबीच्या मार्गिकेत भुयारी मार्ग, बोगदे आणि उंच रस्ते उभारण्यात आले आहे. हत्तींसारख्या मोठ्या वन्यप्राण्यांसाठी रुंद भुयारी मार्ग तर लहान प्राण्यांसाठी स्वतंत्र बोगद्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. कमी तीव्रतेचा पिवळा प्रकाश व ध्वनिरोधक भिंती उभारण्यात आल्या आहेत. या पट्ट्यात १०.९७ किलोमीटर लांबीचा विशेष वन्यजीव भुयारी मार्ग उभारण्यात आला असून, वन्यप्राण्यांच्या मुक्त हालचालीसाठी तो महत्त्वाचा मानला जात आहे.