एक्स्प्रेस वृत्तसेवा, नवी दिल्ली : दिल्लीचे नायब राज्यपाल अनिल बैजल यांनी बुधवारी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना आपला राजीनामा सादर केला. त्यांनी वैयक्तिक कारणासाठी राजीनामा दिल्याचे सांगितले असल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यांनी पाच वर्षे पाच महिने या पदावर काम केले.  १९६९च्या तुकडीचे आयएएस अधिकारी असलेले बैजल यांना डिसेंबर २०१६ मध्ये या पदावर नियुक्त करण्यात आले होते. त्यापूर्वी अटलबिहारी वाजपेयी सरकारच्या काळात त्यांनी दिल्ली विकास प्राधिकरणाचे उपाध्यक्ष आणि केंद्रीय गृहसचिव म्हणून काम पाहिले होते. प्रसार भारती व इंडियन एअरलाइन्स यांसारख्या सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांचे प्रमुख म्हणूनही त्यांनी काम केले.

 सरकारशी संबंधित अनेक मुद्दय़ांवर बैजल यांचे मुख्यमंत्री अरिवद केजरीवाल यांच्याशी भांडण होते. राज्य प्रशासनात नेमण्यात आलेले आयएएस अधिकारी निर्वाचित लोकप्रतिनिधींना सहकार्य करत नसल्याचा आरोप करून, केजरीवाल व त्यांच्या मंत्रिमंडळाने नायब राज्यपालांच्या कार्यालयात दिलेले धरणे हा त्यांच्यातील सर्वात मोठा सामना होता. दिल्ली शहरभर सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे हा वादाच्या प्रमुख मुद्दय़ांपैकी एक होता.