Delhi Ramlila cockroach effigy burning : राजधानी दिल्लीतील पितमपुरा येथे यंदाच्या विजयादशमीच्या रामलीला कार्यक्रमात एक आगळावेगळा प्रयोग पाहायला मिळणार आहे. परंपरा कायम राखत नेहमीप्रमाणे रावण, कुंभकर्ण आणि मेघनाद यांचे पुतळे दहन केले जाणार आहेतच, पण त्यासोबतच यंदा तब्बल ३० फूट उंच झुरळाचा पुतळाही जाळण्यात येणार आहे. हा अनोखा उपक्रम कोणत्याही राजकारणाशी प्रेरित नसून, झुरळ हे आपल्या समाजात पसरलेली घाण, अस्वच्छता आणि रोगांचे प्रतीक मानले जाते, म्हणूनच सामाजिक आरोग्याचा संदेश देण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले आहे. याबद्दल सविस्तर वृत्त दी इंडियन एक्सप्रेसने दिले आहे.
‘स्वच्छतेचा संदेश देण्याचा उद्देश’
श्री केशव रामलीला समितीने हा निर्णय घेतला आहे. समितीचे अध्यक्ष आणि भाजपाचे आमदार अशोक गोयल यांनी ‘एएनआय’शी बोलताना झुरळाचा पुतळा जाळण्यामागे वाईटावर चांगल्याचा विजयाबरोबरच स्वच्छतेचा संदेश देण्याचा उद्देश असल्याचे सांगितले.
स्वच्छ भारत आणि स्वच्छ दिल्ली मोहिमेचा भाग म्हणून हा उपक्रम राबवण्यात येत असल्याचे समितीने म्हटले आहे. रावणाच्या सैन्यातील असुरांच्या प्रतीकात्मक मांडणीतही झुरळाचा समावेश केला जाणार आहे. यापूर्वी समितीने नक्षलवाद आणि दहशतवादासारख्या समस्यांचे प्रतीकात्मक पुतळे जाळल्याचे गोयल यांनी सांगितले. यंदा घरातील, परिसरातील आणि समाजातील अस्वच्छता दूर करण्याचा संदेश देण्यासाठी झुरळाचा पुतळा जाळण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
दिल्लीतील ‘सीजेपी’ आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कार्यक्रम
दिल्लीमध्ये मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी ‘कॉक्रोच जनता पार्टी’ या नावाने सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर हा रामलीला कार्यक्रम होत आहे. मतदार याद्यांच्या विशेष सखोल फेरतपासणी प्रक्रियेत कथित अनियमितता झाल्याचा आरोप करत विरोधी पक्ष आणि विद्यार्थी संघटनांकडूनही आंदोलन केले जात आहे.
मात्र, झुरळाचा पुतळा जाळण्याचा निर्णय या आंदोलनाशी संबंधित असल्याचे आयोजकांनी नाकारले आहे. हा उपक्रम केवळ स्वच्छतेचा संदेश देण्यासाठी असल्याचे समितीचे म्हणणे आहे.
