दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीमध्ये अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीने मिळवलेल्या विजयानंतर देशभरातून आपचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होताना दिसत आहे. सकाळी मतमोजणी सुरु झाल्यापासूनच आपने घेतलेली आघाडी कायम ठेवली आहे. आठ तासांच्या मतमोजणीनंतर आप ५३ जागांवर आघाडीवर आहे तर भाजपा सात जागांवर आघाडीवर आहे. या विजयी आघाडीमुळे आपच्या कार्यकर्त्यांनी संपूर्ण निकाल लागण्याआधीच दुपारपासून आंनदोत्सव सुरु केला आहे. गंमतीची बाब म्हणजे अनेक ठिकाणी आपल्या कार्यकर्त्यांनी भाजपाचे नेते आणि भोजपूरी अभिनेते असणाऱ्या मनोज तिवारी यांच्या चित्रपटांच्या गाण्यांवर डान्स करत आनंद व्यक्त केला आहे.

सकाळी आठ वाजल्यापासून दिल्ली विधानसभा निवडणुकांचे निकालाचे प्राथमिक कल हाती येऊ लागले. दिल्ली विधानसभेच्या ७० जागांसाठी ८ फेब्रुवारी रोजी झालेल्या मतदानानंतर आज जाहीर होणाऱ्या निकालांमध्ये प्रमुख लढत ही भाजपा आणि अरविंद केजरीवाल यांच्या आपमध्ये असल्याचे स्पष्ट होतं. बहुमतासाठी लागणारा ३६ जागांचा आकडा आप सहज गाठेल असं चित्र सकाळपासूनच दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर आपच्या समर्थकांनी आनंदोत्सव साजरा करण्यास सुरुवात केली आहे. सोमवार संध्याकाळपासून दिल्लीमधील आपच्या कार्यालयामध्ये निवडणुकीच्या विजयाची तयारी सुरु झाली. आयटीओ येथील आपच्या कार्यालयामध्ये काल संध्याकाळपासून मिठाईचे पुडे आणि इतर पदार्थ मागवण्यात आले.

दुपारी बारानंतर आपने घेतलेल्या निर्णयक आघाडीवर शिक्कामोर्तब झाल्यानंतर दिल्लीमध्ये ठिकठिकाणी आपच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष सुरु केला. अनेक ठिकाणी चौकाचौकांमध्ये आपच्या कार्यकर्त्यांनी गाणी लावून डान्स केला. विशेष म्हणजे यावेळेस आपच्या कार्यकर्त्यांनी मुद्दाम भाजपाचे नेते असणाऱ्या मनोज तिवारी यांच्या चित्रपटातील गाण्यांवर डान्स केल्याचे पहायला मिळाले. आता याच जल्लोषाचे व्हिडिओ आपच्या समर्थकांनी सोशल नेटवर्किंगवर व्हायरल केले आहेत.

भाजपाचे नेते मनोज तिवारी यांनी भाजपाचा नक्की दिल्लीमध्ये विजय होईल असं मत व्यक्त केलं होतं. तिवारी यांनी सोमवारी केलेल्या एका ट्विटमध्ये भाजपाचा विजय निश्चित असल्याचे म्हटलं होतं. त्यावरुन आता आप समर्थकांनी त्यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे.