दिल्लीतल्या विवेक विहारमध्ये एका इमारतीला आग लागली. या आगीत ९ जणांचा होरपळून मृत्यू झाला, तसंच अनेक लोक जखमीही झाले आहेत. आग इतकी भीषण होती की इमारतीत जे लोक झोपले होते त्यांना त्यांचा जीवही वाचवता आला नाही. कुणाचा मृतदेह बेडवर होता तर काही जणांचे मृतदेह जिन्यांवर मिळाले. इमारतीतल्या दुसऱ्या मजल्यावर एसीचा स्फोट झाल्यामुळे ही आग लागली असाही संशय व्यक्त होतो आहे.

तिसऱ्या मजल्यावरचे लोक वर पळाले पण…

तिसऱ्या मजल्यावर राहणाऱ्या कुटुंबाने आपला जीव वाचवण्यासाठी गच्चीवर जाण्याचा निर्णय घेतला ते त्या दिशेने पळाले, पण गच्चीचा दरवाजा बंद होता. त्यामुळे ते तिथेच अडकले आणि आगीत होरपळून जिन्याच्या पायऱ्यांवरच त्यांचा मृत्यू ज्या ठिकाणी घटना घडली तिथेही चारजण उपस्थित होते त्यांचाही आगीत होरपळून मृत्यू झाला. जी आग लागली ती एसीमुळे लागली असं सांगितलं जातं आहे. घरातल्या एसीचा स्फोट होऊ शकतो का? काय काळजी घेतली पाहिजे हे जाणून घेऊ.

AC मुळे स्फोट होऊ शकतो का?

होय घरातल्या एसीमुळे स्फोट होऊ शकतो. घरातल्या एसीचा स्फोट होऊन आग लागली तर सगळा धूर घरात पसरतो.

एसी असलेली खोली ही बंद असते, त्यामुळे जे लोक त्या खोलीत झोपलेले असतात ते गुदमरु शकतात.

एसीमुळे खोली थंड रहावी म्हणून लोक संपूर्ण खोलीच्या खिडक्या आणि दरवाजे बंद करतात. अशात जर स्फोट झाला तर लोक धुरामुळे गुदमरण्याची चिन्हं असतात.

एसीच्या आतमध्ये प्लास्टिक, वायर यासह असे काही भाग असतात ज्यामुळे घरामध्ये विषारी धूर पसरु शकतो. या धुरात कार्बन मोनाक्साइडचाही समावेश आहे.

कार्बन मोनाक्साइडचं प्रमाण वाढलं तर शरीराला लागणारा ऑक्सिजन मिळण्याचं प्रमाण आपसूकच कमी होतं. सुरुवातीला चक्कर येणं, बेशुद्ध होणं अशा घटनाही घडू शकतात.

Delhi Fire News
अग्निशमन दलाने प्रयत्नांची शर्थ करत सकाळी ८ च्या दरम्यान आगीवर नियंत्रण मिळवलं. (फोटो-इंडियन एक्स्प्रेस)

एसीचा स्फोट होण्याची किंवा आग लागण्याची कारणं काय आहेत?

एसीचा कॉम्प्रेसर मोठ्या प्रमाणावर तापला तर स्फोट होण्याची शक्यता असते. एसी उन्हाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणावर सुरु असतो त्यामुळे अशी स्थिती दीर्घकाळ राहिली तर क्रॉम्प्रेसर तापण्याची शक्यता अधिक असते.

एसीमध्ये शॉर्ट सर्किट झालं तरीही आग लागू शकते किंवा स्फोट होऊ शकतो. एसीची मागणी उन्हाळ्यात जास्त प्रमाणावर असते. अशात जर वायर जास्त प्रमाणात तापल्या किंवा जळाल्या तर शॉर्ट सर्किट होऊ शकतं आणि त्यामुळेही आग लागू शकते.

एसीच्या मागच्या मोटरमध्ये गॅस असतो, त्याची पातळी वेळच्या वेळी तपासून पाहिली गेली पाहिजे. तसंच एसी फार धुळीने माखलेला किंवा घाण असता कामा नये त्यामुळेही शॉर्ट सर्किट होण्याची चिन्हं असतात.

एसीमुळे लागणाऱ्या आगीपासून रक्षण कसं करु शकता?

आगीपासून आपलं घर, खोली, कुटुंबातले सदस्य सुरक्षित रहावेत म्हणून काही खास उपकरणं वापरु शकता. ज्यामुळे पोर्टेबल फायर अलार्म सिस्टिम किंवा फायर सेफ्लीट बॉलचा समावेश होतो.

फायर सेफ्टी बॉल हा एक ते सव्वा किलो वजनाचा असतो. त्याला Fire Extinguisher Ball असंही म्हणतात. याची किंमत साधारण ८०० ते १ हजार रुपये असते. छोट्या प्रमाणावर लागलेली आग किंवा तत्सम घटना असेल तर हा फायर बॉल जाणून घेतो आणि तीन ते दहा सेकंदात त्याचा स्फोट होतो. ज्यामुळे आग नियंत्रणात येऊ शकते. याशिवाय पुढील काळजी एसी वापरताना घेणं आवश्यक आहे.

एसीचा वापर करताना कुठली काळजी घ्यावी?

एसीचा सतत होणारा वापर टाळा

एसीचे फिल्टर्स दर १० ते १५ दिवसांनी स्वच्छ करा

एसी वापरा पण टायमरही लावा आणि टायमरने एसी बंद केल्यावर तो पुन्हा तातडीने लावू नका.

एसीसाठी वेगळं वीज कनेक्शन असलं पाहिजे, त्याचं बटण आणि स्विच हे देखील स्वच्छ ठेवा.

एसीच्या मागच्या बाजूला असणारं युनिट हे खेळत्या हवेत आहे ना? याची काळजी घ्या. ते चुकूनही झाकून ठेवू नका.

एसीची सर्व्हिसिंग वेळच्या वेळी करुन घ्या. तसंच उन्हाळ्यात गॅस लेव्हल्सही तपासून बघा.

व्होल्टेज कमी जास्त होत असेल तर त्या कालावधीत एसी बंदच ठेवा, सुरु करु नका. व्होल्टेज योग्य प्रमाणात नियंत्रणात आल्यावरच एसीचा वापर करा.

दिल्लीतल्या विवेक विहार मधील इमारतीला आग लागून नऊ जणांचा मृत्यू

१) अरविंद जैन
२) अनिता जैन
३) निशांत जैन
४) आकाश जैन
५) शिखा जैन
६) नितीन जैन
७) शैलई जैन
८) सम्यक जैन

९ पैकी आठ मृतांची ही नावं समोर आली आहेत. घटना घडतास आग नियंत्रणात आणण्यासाठी अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी पोहचले होते. सकाळी ८ च्या सुमारास आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश मिळालं.